आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडपट हमीभावाशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाही- किशोर तिवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सरकार लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा हमी भावाचे कवच शेतकऱ्यांना देणार नाही व बँकांचे दरवाजे सर्व शेतकऱ्यांना सक्तीने खुले करणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे. 

 

सरकारी बँका निरव मोदी -ललित मोदी यांनाच हजारो कोटींचे कर्ज देतात. मात्र शेतकरी-शेत मजुरांना बँकांची दारे बंदच ठेवतात. याचा फायदा घेत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सरासरी २४ ते ३६ टक्के व्याजाने अनियंत्रित कर्ज वाटप केले आहे. यांच्या सरकारी संरक्षणात सुरु असलेल्या पठाणी वसुलीने अनेक शेतकऱ्यांनी व बचत गट चालविणाऱ्या महिला मजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्राचा समावेश सर्वाधिक मायक्रो फायनान्स कंपन्या असणाऱ्या पहिल्या पाच राज्यांत होतो. सध्या सुमारे ९८०० कोटी रुपये वाटून ४५ कंपन्या राज्यामध्ये मायक्रो फायनान्स क्षेत्रात प्रचंड हैदोस घालत आहे. या कंपन्यांना आवर घालण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे. शेतकरी मिशनने मोदी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता सुरू असलेल्या योजनांचे स्वागत करीत हमी भावाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही, याकडे लक्ष वेधले आहे.

 

 विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांमधून सुमारे ९० टक्के शेतकरी नवे पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. मात्र बँकांना त्यासाठी सक्ती करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे. संपुआ सरकारने २००८ मध्ये जाहीर केलेल्या ७२ हजार कोटींच्या कृषी कर्ज माफीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या आग्रही भूमिकेने जास्तीत जास्त ५ एकराची शेतीच्या मालकीच्या अटीमुळे विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त भागातील शेतकरी वंचित राहिले होते त्यांचा या कर्जमाफीत समावेश होणार असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांचे दरवाजे १० ते १५ वर्षानंतर पुन्हा उघडणार आहे. त्यांना मदत करायची असेल तर ब्रिटिशकालीन कृषी पीक कर्ज वाटप बंद करून पंचवार्षिक पत पुरवठा धोरण तत्काळ राबवण्यावर भर दिला पाहिजे असे मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...