आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनच्या फक्त पिलर्ससाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना पुलाखाली शेती करणे शक्य : CM

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशाच्या आर्थिक विकास दराचा वेग वाढवण्यासाठी मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प गरजेचा अाहे. स्थानिकांशी चर्चा करून त्यातील अडथळे दूर करत तो वेगाने पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. या प्रकल्पात फक्त पिलर्ससाठीची जमीन संपादित करण्यात येणार आहे, तसेच पुलाखालील जमिनीवर शेतकरी शेती करू शकतील, असे स्पष्टीकरण देतानाच बुलेट ट्रेनमुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. 


काँग्रेसचे संजय दत्त, राष्ट्रवादीचेे धनंजय मुंडे, शिवसेनेच्या नीलम गाेऱ्हे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली हाेती. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, 'देशातील १ टक्क्याहून कमी लोक विमानाने प्रवास करत हाेते, तेव्हाही हवाई वाहतुकीत गुंतवणूक करण्यात आलीच हाेती. देशाचा विकास दर वाढण्याच्या उद्देशाने बुलेट ट्रेनचा प्रकल्प गरजेचा अाहे. त्याची निर्मिती देशात होणार असल्याने त्यातून मोठा रोजगार निर्माण होईल व त्यासाठी अत्यंत कमी व्याजदराने आपल्याला दीर्घ मुदतीचे कर्ज मिळत अाहे.' 


बुलेट ट्रेनबाबत विराेधकांनी मांडलेेले प्रश्न आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरे...

 
विरोधक : मूठभरांच्या हिताचा हा प्रकल्प कोणासाठी? 
मुख्यमंत्री :
देशाच्या आर्थिक विकास दरवाढीसाठी हा प्रकल्प आवश्यक. 


विरोधक : प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार नसताना भूसंपादन का? 
मुख्यमंत्री :
अहवाल आला आहे, तीन जनसुनावण्याही पूर्ण झाल्यात. 


विरोधक : शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध आहे, त्याचे काय? 
मुख्यमंत्री :
फक्त पिलर्ससाठीची जमीन हवी आहे, पुलाखालील जमिनीवर शेतकऱ्यांचीच मालकी असणार आहे. 


विरोधक : ग्रामसभांनी विरोधात ठराव केला आहे. तरीही हा तुम्ही प्रकल्प कसा रेटता? 
मुख्यमंत्री :
समृद्धी महामार्गास विरोध करणाऱ्यांनी नंतर संमती दिली, तशीच आताही देतील. 


विरोधक : या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रावर प्रति किलोमीटरमागे २२५ कोटी रुपये, तर गुजरातवर प्रति किलोमीटरमागे ६९ कोटी रुपये खर्च येत असल्याने गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर अधिक भार कशासाठी? 
मुख्यमंत्री :
कोकण रेल्वे प्रकल्पातही देशातील अन्य राज्यांनी निधी दिला हाेता, पण अधिक लाभ महाराष्ट्रालाच झाला. 


विरोधक : पालघरसारख्या जिल्ह्यात कुपोषणाचे, गरिबीचे प्रश्न असताना बुलेट ट्रेनचाच आग्रह कशासाठी? 
मुख्यमंत्री :
दळणवळणाची जलद साधने निर्माण झाली की तिथे विकास पोहोचेल. 


विरोधक : मुंबई - अहमदाबाद रेल्वेची ४० टक्के तिकिटे पडून असताना बुलेट ट्रेन कशासाठी? 
मुख्यमंत्री :
एका खासगी वाहिनीचा हा रिपोर्ट होता, त्यात तथ्य नाही. या मार्गावर अॅडव्हान्स बुकिंग असते. 

बातम्या आणखी आहेत...