आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन असल्यामुळे लग्न होऊ शकत नाही, म्हणून प्रेमी युगुलाने रेल्वेखाली केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरूड- गोरेगाव येथून शनिवारपासून बेपत्ता असलेल्या वीरेंद्र राजुलाल आहाके वय २४ व पल्लवी श्याम माहुरे या प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवार, २५ जूनला साडेपाचच्या सुमारास गावाशेजारी अमरावती-नरखेड मार्गावर घडली. 


शनिवार पासून राहत्या गावातून फरार असलेले प्रेमीयुगल हे गावा शेजारी येऊन नरखेड- अमरावती रस्त्यावर असलेल्या गोरेगावजवळ सोमवारी पहाटे साडेपाच वाजता काचीगुडा एक्सप्रेसच्या खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. बेनोडा शहीद पोलिस स्टेशनअंर्तगत येत असलेल्या गोरेगाव येथील विरेंद्र आहाके व पल्लवी माहुरे यांच्यात अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते. शनिवारपासून ( दि. २३) दोघेही बेपत्ता होते. 


दरम्यान त्यांनी लग्न करण्याचाही प्रयत्न केला. परंतु पल्लवी अल्पवयीन असल्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. मुलीची आई गावात राहत नसल्यामुळे मुलगी ही एकटीच वडिलांकडे राहत होती. वडील मोलमजुरी करून पाेट भरत होते. सकाळ पासूनच शेतावर कामाला गेल्यानंतर मुलगी घरी एकटीच राहत होती. त्यातच ती वीरेंद्रच्या प्रेमात पडली होती. दरम्यान, घरून पळून गेल्यानंतर पल्लवी अल्पवयीन असल्यामुळे लग्न होऊ शकत नसल्याचे तिला कळले. त्यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत गावानजीक रेल्वे मार्गावर आढळून आले. बेनोडा शहीद पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, दोघांचे मृतदेह ग्रामीण रूग्णालय वरूड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...