आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मचाण प्राणिगणना बंद; कॅमेरा ट्रॅपिंगने माेजणी, जुन्या पद्धतीत दाेष असल्याचे दिले कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मचाणीवर बसून केली जाणारी प्राणिगणना या वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा अभयारण्याच्या प्रशासनाने घेतला अाहे. ब्रिटिशांच्या काळापासून सुरू असलेल्या या पद्धतीत अनेक त्रुटी, दाेष असल्यामुळे ती बंद करून अाता  ट्रान्झिट लाइन मेथड आणि कॅमेरा ट्रॅपिंगच्या साहाय्याने या वर्षीपासून वन्यप्राण्यांची गणना करण्यात येईल. मात्र बुद्ध पाैर्णिमेला रात्रभर मचाणीवर बसून प्राणिगणनेचा अानंद घेणाऱ्या वन्यजीवप्रेमींची या निर्णयामुळे घाेर निराशा झाली अाहे.  


यंदाची बुद्ध पौर्णिमा ३० एप्रिल राेजी अाहे. या दिवशी देशभरातील वन्यजीवप्रेमींसाठी सर्वात मोठी पर्वणी असते. जंगलात वन्यजीवप्रेमींना अगदी जवळून वन्यप्राणी पाहण्याची संधी त्यांना मिळत असते. उन्हाळ्यात जंगलातले पाणवठे आटतात, पानगळतीमुळे जंगलात दूरपर्यंत प्राणी स्पष्ट दिसतात. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लख्ख चंद्रप्रकाशात ही मचाण प्राणिगणना केली जाते. ही पद्धत अगदी ब्रिटिशांच्या काळापासून चालत आली आहे. पाणवठ्याशेजारी मचाण बांधायचे, त्यावर २४ तास बसायचे आणि पाणवठ्यावर आलेल्या प्रत्येक प्राण्याची नोंद घ्यायची, अशी ही साधी-सोपी पद्धत. मात्र ताडोबा प्रशासनाच्या मते, या पद्धतीत अनेक दोष असून आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. त्यामुळे अाता या वर्षीपासून ट्रान्झिट लाइन मेथड आणि कॅमेरा ट्रॅपिंगच्या साहाय्याने वन्यप्राण्यांची गणना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला अाहे.  


ताडोबा प्रशासनाने मचाणीवरून प्राणिगणनेची पद्धत बंद केल्याने या दिवसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वन्यजीवप्रेमींमध्ये मात्र  नाराजी पसरली आहे. त्यांच्या मते, नव्या निर्णयामुळे  नवीन लोकांना वन्यजीवांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार नाही. ताडोबा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय राज्यातील इतरही व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये घेतला जातो का, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

 

अाठ वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे गणना  
भारतात २०१० पासून कॅमेरा ट्रॅपिंगला सुरुवात झाली. संपूर्ण देशात एकाच वेळी जंगलात कॅमेरे लावून फोटोंच्या मदतीने वन्यप्राण्यांची गणना केली जाते. ही पद्धत अतिशय अचूक असल्याने देशातील वाघांची खरी संख्या या माध्यमातून कळली, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा अाहे. या पद्धतीमुळेच २०१० नंतर खऱ्या अर्थाने देशात वाघांच्या संवर्धन मोहिमेला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...