आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समृद्धी'महामार्गावर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी महिनाभरात उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर-मुंबई समृद्धी सुपर एक्स्प्रेस महामार्गावर प्राण्यांची सुरक्षितता जपण्यासाठी महिनाभराच्या कालावधीत वन विभागाकडून उपाय सुचवले जाणार आहेत. मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांचे प्रकल्प संचालक तसेच रस्ते महामंडळाचे नागपूर आणि अमरावती विभागाचे अधीक्षक अभियंता जुलै महिन्यात या महामार्गावर विविध ठिकाणी जाऊन तपासणी करतील. त्यानंतर, या महामार्गावरील प्राण्यांच्या सुरक्षिततेचा अहवाल राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. 


महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील कारंजा-सोहोळक काळवीट अभयारण्यातून तसेच वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यातून जातो. तसेच, बोर व्याघ्र प्रकल्पाचा काही भागातून देखील हा महामार्ग जातो आहे. या मार्गाच्या भवताल वन्य प्राण्यांचा अधिवास असून त्यांचे जाणे-येणे देखील या भागातून होत असते. या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. या उपाययोजना योग्य प्रकारे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यावर देखरेख करण्यासाठी राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख ए.के.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची बैठक गुरुवारी वनभवन येथे आयोजित करण्यात आली होती. 


वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. रस्ते विकास महामंडळाकडून केल्या जाणाऱ्या कामांची तपासणी जुलै महिन्यात होणार आहे. त्यासाठी मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांचे प्रकल्प संचालक तसेच रस्ते विकास महामंडळाचे नागपूर आणि अमरावती विभागाचे अधीक्षक अभियंता महामार्गावर विविध ठिकाणी भेटी देतील. त्यांच्या भेटीनंतर आणखी कोणते उपाय करावेत, झालेल्या उपाययोजनांची परिस्थिती याबाबत अहवाल तयार केला जाईल. तो अहवाल राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे मजुरीकरिता पाठवण्यात येईल, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि समितीचे सचिव सुनील लिमये यांनी दिली. 


बैठकीत विविध विषयांवर करण्यात आली चर्चा 
समृद्धी महामार्गावर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या शिवाय, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सल्ल्यानुसार येणाऱ्या काळात करावयाच्या उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. या संदर्भातील एक सादरीकरण रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारच्या बैठकीत केले. महामार्गावर प्राण्यांच्या हालचालीसाठी कुठे अंडरपास, ओवरपास किंवा खुले भुयारी मार्ग असावेत तसेच जाळ्या बसवण्याची ठिकाणे इत्यादींबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...