आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मराठवाड्यात उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा मंगळवारी विधान परिषदेत करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रादेशिक कोटा पद्धतीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या लक्षवेधी प्रश्नावरून मंगळवारी विधान परिषदेत गदारोळ झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली.


मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील ७०-३० चा कोटा रद्द करण्याची विराेधी अामदारांची प्रमुख मागणी होती. त्यावर हा कोटा १९८५ पासून असल्याचे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले. मात्र विरोधी आमदारांनी वेलमध्ये धाव घेत गदारोळ केला. दरम्यान, महाजन यांनीही वेलमध्ये प्रवेश केल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी लक्षवेधी राखीव ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घाेषणा महाजन यांनी केली. हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केला होता. 

 

- मेडिकल प्रवेशांमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय, ७०-३० चा फॉर्म्युला रद्द करण्याची विराेधकांची मागणी 
- राज्यातील ३८ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मराठवाड्यात फक्त ६ महाविद्यालये. 
- मराठवाड्यातील ७५० जागांपैकी १५ टक्के जागा केंद्रासाठी व ३० टक्के मराठवाड्याबाहेरील विद्यार्थ्यांना राखीव असल्याने विभागाच्या वाट्याला फक्त ४४६ जागा. 


महाजनांनी माफी मागावी
मंत्र्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही तर विरोधक सभागृहातील वेलमध्ये धाव घेतात. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनीही वेलमध्ये यावे हे चुकीचे आहे. याबद्दल महाजन यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 


कोट्याबाबत विषमता : गिरीश महाजन
मराठवाड्यातील ७०-३० चा कोटा अन्यायकारक आहे. परंतु हा कोटा १९८५ पासून आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यानुसार या वर्षी उस्मानाबाद आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले. 

बातम्या आणखी आहेत...