आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा कंपन्यांच्या \'थट्टात्मक’ मदतीची चौकशी, किमान 500 ची मदत मिळेल : सदाभाऊ खोत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रुपया, दोन रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल व शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश मिळेल, यासंबंधीचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना खोत बोलत होते.   


ते म्हणाले,  पीक विम्याअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना १ हजार १२६ कोटी रुपये देण्यात आले असून येत्या काळात ११ हजार ९०० कोटी रुपये जमा केेले जाणार आहेत. बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी ७ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना सुमारे ९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश ४१ कंपन्यांना देण्यात आले असल्याचे खोत यांनी सांगितले. कंपन्यांनी भरपाई न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.   


तारीख सांगा, अन्यथा विधानसभेतच ठाण   
बोंडअळी, मावा व तुडतुड्यांमुळे उद्ध्वस्त शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये जाहीर झालेली मदत सरकार कधी देणार, याची तारीख जाहीर होईस्तोवर आपण विधानसभेचे सभागृह सोडणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार मुळीच गंभीर नाही, असा आरोप विखे यांनी केला. दरम्यान, ६ जुलै रोजी कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत बियाणे कंपन्यांना नोटीस जारी केली, असे कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले..


बागडेंनी खडसावले, खडसेंनी सुनावले  
शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १ रुपया, २ रुपये अशी नुकसान भरपाई मिळाल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. त्यावर मंत्री खोत यांना उत्तर न देता आल्याने ‘तुमच्या विभागाने ही माहिती यापूर्वीच घ्यायला हवी होती. विमा कंपन्यांनी नेमक्या कोणत्या आधारे ही मदत शेतकऱ्यांना दिली, याची चौकशी करा,’ अशा शब्दांत विधानसभाध्यक्ष बागडे यांनी खोत यांना खडसावले.  तर, ‘ही योजना विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी नाही. कंपन्यांनी शेतकऱ्यांची टिंगल चालवली आहे,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी खडसावले.

 

बातम्या आणखी आहेत...