आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचे सालपटं काढायला मी चाललो भोकरदनला, आमदार बच्चू कडू यांचा घणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा/ दर्यापूर - शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे सालपटं काढायला मी भोकरदनला चाललो असल्याचा घणाघात प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केला. तेथून परत येई पर्यंत तूर, हरभऱ्याचा काटा करत शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले नाही तर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरात २७ मे पासून मुक्काम करण्याचा इशारा कडू यांनी तिवसा आणि दर्यापूर येथील आसूड यात्रेच्या निमित्याने आयोजित जाहीर सभेतून बुधवारी (२३ मे) दिला.

 

यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथून आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रा मंगळवार २२ मे पासून प्रारंभ झाली आहे. दुसऱ्या दिवशी आमदार कडू यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी सभा घेतल्या. तिवसा नगर पंचायत कार्यालयाजवळ मैदानात सकाळी ११ वाजता आसूड यात्रेची सभा पार पडली. तर दर्यापूर येथे बसस्थानक चौकातील वा. का.धर्माधिकारी कन्या शाळेच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता सभा पार पडली. तिवसा येथील सभेत बोलताना कडू म्हणाले, आसूड बैलांवर ओढले जात होते. मात्र आता आसूड सरकारवर उगारण्याची वेळ आली आहे. स्वामीनाथन आयोग हा २००६ मध्येे स्थापित झाला, मात्र काँग्रेसवाल्यांनी तो लागू केला नाही. विदर्भाचा अनुशेष अद्यापही भरुन निघाला नाही. काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मनी आहे. दोन्ही सरकारने शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम केल्याने कडू म्हणाले. आसूड यात्रा काढण्याची वेळ का येते, शेतकरी समाज खत्म करण्याचे धोरण सरकार राबवत आहे.


आज आम्ही पाहतो का तूर, हरभरा, कापसाचे भाव निम्मावर गेले आहे. शेतमजूर, दिव्यांग, विधवा, बेरोजगार अशा विविध प्रश्नांना घेऊन आम्ही आंदोलन करीत असतो. यवतमाळ जिल्ह्यात ज्या दाभळी गावात मोदींनी चाय पे चर्चा केली त्या गावातच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणून त्या गावातून आम्ही आसूड यात्रा सुरू केल्याचे कडू म्हणाले. तिवसा येथील सभेत मंचावर प्रहार जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, कृउबासचे माजी सभापती मंगेश देशमुख, माजी जि.प. सदस्य अनिल खांडेकर, राज माहोरे, गजानन कडू यांच्यासह अन्य जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आमदार कडु यांना ऐकण्यासाठी तालुक्यातील हजारो शेतकरी तिवस्यात दाखल झाले होते. दर्यापूर येथील सभेला प्रदीप चौधरी, अनिल भडांगे, गझल सम्राट नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख महेश कुरळकर, मनोज अढाउकर डॉ. दिनेश म्हाला, प्रदीप वडतकर, सुधीर पवित्रकार, रितेश बारहाते, आशिष साखरे, अमीत धांडे, आशिष ऊखळकर, सुनील पुरी, मंगेश सावळे, अनुराधा गावंडे, चित्रा अवतारे उपस्थित होते. आसूड यात्रेत सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अहमदनगर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरसह इतर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

 

वाहतूक खोळंबली : तिवसा येथून आसूड यात्रा दर्यापूरला जाणाकरीता निघाली. दुपारी १ वाजता अमरावती शहरात दाखल झाली. मिनी बायपास मार्गाने बसस्थानकासमोरुन राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते इर्विन चौकात यात्रा आली. येथून पंचवटी चौकातून ही यात्रा दर्यापूरला रवाना झाली. शहरात वाहतुकीचा मात्र मोठा खोळंबा झाला होता.


बेरोजगारांची थट्टा
'नरेंद्र मोदी म्हणाले, एक करोड लोगो को रोजगार मिलेगा', कुठे मिळाला रोजगार, तरूण बेरोजगारी झाले वरूण सरकार वडा पाव विकायला लावून त्यांची थट्टा करीत असल्याचे टिकास्त्र कडू यांनी सोडले.

 

निरव मोदी, विजय माल्याचे काय?
डिजीटल इंडिया हा फक्त भाजपसाठीच आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कर्ज माफीसाठी नवरा-बायकोला रांगेत उभे केले. शासनाकडे संपूर्ण माहिती उपलब्ध असताना शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी त्रास दिला. चाळीस लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे कर्ज माफ केल्याचा गवगवा करीत आहे. मात्र निरव मोदी, विजय माल्या यांनी २० हजार कोटी पेक्षा जास्त पैसे बुडवले त्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...