आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगरांना आरक्षण देणार की जाणार, आमदार रामराव वडकुते यांचा सरकारला सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जोतिबाच्या भंडाऱ्याचं प्रतीक असलेला पिवळा कुर्ता आणि खांद्यावर घोंगडी अशा वेशात विधान परिषदेत अालेले आमदार रामराव वडकुते यांनी बुधवारी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. 'धनगरांच्या मतांवर निवडून आलेलं भाजप सरकार, धनगरांना आरक्षण देणार की जाणार' असा प्रश्न त्यांनी केला. यावर बाजू मांडण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उभे राहिले पण विरोधी पक्षांनी त्यांना बाेलू दिले नाही. सावरा यांनी यापूर्वी धनगर आरक्षणविरोधी भूमिका घेतली अाहे, त्यामुळे अाता मुख्यमंत्र्यांकडूनच या विषयावर उत्तर हवे, असा आग्रह विरोधकांनी धरला. अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या उत्तरासाठी या प्रश्नावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली.

 

'१४ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरला मोर्चा काढला होता. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न बाेलावता या माेर्चात सहभागी झाले हाेते तसेच आम्ही सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांना अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते,' याची वडकुते यांनी सरकारला आठवण करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मात्र 'महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाबाबतचा प्रस्ताव पाठवला नाही,' असा खुलासा केंद्रीय मंत्र्यांनी केला असल्याचे वडकुते यांनी सभागृहात वाचून दाखवले.

 

ज्यांच्या मतांच्या जोरावर सत्तेत आलात, त्या धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही, असा प्रश्न या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला. अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने धनगर समाजाच्या सामाजिक - आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे सोपवलेला अभ्यास म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा असल्याची टीका मुंडेंनी केली. धनगर समाजाला खुश करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यात आले, पण ती अधिसूचना का काढण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.

 

मुंडे असते तर...
धनगर आरक्षणाच्या मागणीला शिवसेनेचा तत्त्वत: पाठिंबा असल्याची भूमिका आमदार नीलम गोऱ्हे यांनी मांडली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे असते तर धनगरांना आरक्षण मिळाले असते, असे उपरोधिक मत त्यांनी सभागृहात मांडले. धनगर समाज अत्यंत मागासलेला असून त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे मांडून अभ्यास समित्या आणि अहवाल हा सरकारचा वेळकाढूपणा असल्याची टीका त्यांनीही केली.

 

बातम्या आणखी आहेत...