आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ विकास मंडळावरील अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर आमदार संचेती नाखुश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित विकास मंडळांचा विशेष निधी बंद करण्यात आल्याने या मंडळांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सत्ताधारी नेत्यांमधील फारसे कोणीही उत्सूक नव्हते. साडेतीन वर्षे ही पदे रिक्त राहिल्यावर आता विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राच्या मंडळांवरील अध्यक्षांची नावे राज्य शासनाने राज्यपालांकडे पाठविली असली तरी विदर्भ विकास मंडळावरील अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती नाखुश असल्याचे दिसून आले आहे. 


साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर राज्य शासनाने मागील आठवड्यात विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी आमदार चैनसुख संचेती तर उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासाठी योगेश जाधव यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल कार्यालयाकडून अद्याप त्यावर कुठलीही अधिसूचना निघालेली नाही. 


विदर्भ विकास मंडळाच्या नागपुरातील कार्यालयात नव्या अध्यक्षांची प्रतीक्षा सुरु आहे. यासंदर्भात संचेती यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी "विदर्भ विकास मंडळात फारसे काही करण्यासारखे नाही. मात्र, काही विचार करूनच नेतृत्वाने आपल्याकडे ही जबाबदारी देण्याचे ठरवले असावे.." अशी कबुली देत संचेती यांनी या नियुक्तीवर आपण फारसे खुश नसल्याचे स्पष्ट केले. आमदार संचेती यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा आजवर अनेकदा रंगली. तथापि, प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली असताना आपला विचार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 


बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संचेती हे भाजपच्या विदर्भातील ज्येष्ठ आमदारांपैकी एक मानले जातात. विकास मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त असला तरी मंडळांकडे निधीच्या खर्चाचे कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत. तिन्ही मंडळांना पूर्वी मिळत असलेला एकत्रित असा १०० कोटींचा निधीही मागील चार वर्षांपासून बंद झाला आहे. त्यामुळे मंडळाला विकासाची एकही योजना स्वत:हून हाती घेता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


केवळ विकासातील समस्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करणे आणि राज्य शासनाला शिफारसी करणे, एवढीच मंडळाची भूमिका शिल्लक ठेवण्यात आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मंडळाचे केवळ नामधारी अध्यक्षपद स्वीकारण्यास मागील चार वर्षात कोणीही तयार झाले नाही, असे मंडळातील अधिकाऱ््यांचे म्हणणे आहे. 


विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री राहिलेले आमदार आमदार सुनील देशमुख यांच्या नावाचा विचारही सुरुवातीला राज्य शासनाकडून झाला होता. मात्र, त्यावर नाराजी व्यक्त करीत सुनील देशमुख यांनी मंडळावर जाण्यास नकार दिला होता. देशमुख यांची यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...