आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमधील विधानभवनाच्या इतिहासात ५७ वर्षानंतर प्रथमच अतिवृष्टीमुळे अधिवेशनाचे कामकाज तहकूब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी १० वा.  : वीज खंडित व अाभाळ झाकाेळल्याने झालेल्या अंधारात विराेधकांनी माेबाइल टाॅर्च लावून अांदाेलन केले. - Divya Marathi
सकाळी १० वा. : वीज खंडित व अाभाळ झाकाेळल्याने झालेल्या अंधारात विराेधकांनी माेबाइल टाॅर्च लावून अांदाेलन केले.

नागपूर- पुरेशा नियोजनाविना नागपुरात अधिवेशन घेण्याचा अट्टहास राज्य सरकारच्या चांगलाच अंगाशी आला. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज अक्षरश: 'वाहून' गेले. विधानभवनाच्या तळघरातच पाणी शिरल्याने वीजपुरवठ्याअभावी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. या ढिसाळ नियोजनाबद्दल विरोधक आणि सत्ताधारी शिवसेनेने भाजपला लक्ष्य करत सरकारी कारभारावर चांगलेच कोरडे ओढले. ५७ वर्षांपूर्वी १९६१ साली नागपूरला उपराजधानी घोषित केल्यानंतर येथे झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले होते. 


गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने नागपूरला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या विधानसभेच्या विशेष बैठकीला अगदी तुरळक संख्येने आमदार उपस्थित होते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तर दुपारी बारा वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पाचच मिनिटांनी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. दरम्यान, रात्रीच्या पावसामुळे विधानभवनाच्या तळघरात पाणी शिरले आहे. तिथेच वीजपुरवठ्याचे नियंत्रण असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विधानभवनाची वीज बंद करण्यात अाली. झाकाेळून अालेले अाभाळ व वीज नसल्याने हा परिसर सकाळी १०- ११ वाजताही अंधारमय हाेता. 


सव्वा तासाने वीज सुरळीत 
> एक तास २० मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत केला : ऊर्जामंत्री बावनकुळे 
> गैरसाेयीमुळे उपअभियंत्याला नोटीस बजावली : बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील 


सुरक्षा व्यवस्था काळोखात
वीज खंडित केल्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा यंत्रणा बंद पडली. सुरक्षा कर्मचारीही मोबाइल फोनच्या टाॅर्चने येणाऱ्या जाणाऱ्यांची ओळखपत्रे तपासत होते, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आपल्या दालनात मेणबत्तीच्या उजेडात कामकाज केले. 


पावसासह सरकारला विरोधकांनी 'झोडपले' 
दिवसभरासाठी स्थगित झालेले कामकाज आणि खंडित झालेल्या वीजप्रवाहाच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारच्या नियोजनशून्यतेवर जोरदार तोंडसुख घेतले. भाजप सरकारचा हा पोरखेळ असून एका पावसात या सरकारच्या मर्यादा स्पष्ट झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली. नागपूरला अधिवेशन घेण्याचा अट्टहास सरकारला चांगलाच नडला असून या हट्टी सरकारला जागा दाखवून देण्याची वेळ आता आल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची नामुष्की सरकारवर ओढावल्याची टीका केली, तर सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संपूर्णपणे कोलमडल्याचे सांगत हे नागपूर महापालिकेचे अपयश असल्याची टीका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. 


१९६१ मधील कामकाज स्थगितीची इतिवृत्तात नाेंद 
१९६१ मध्ये नागपुरात पहिले पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळीही अतिवृष्टी आणि वीज खंडीत झाल्याने २३ ते २५ ऑगस्टदरम्यान दाेन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते. त्याची इतिवृत्तातही नाेंद अाहे. 


पिशव्या, दारूच्या बाटल्यांनी विधानभवनाचे नाले तुंबले 
शुक्रवारच्या पावसाने राज्य सरकारच्या नियोजनाच्या मर्यादा उघड केल्या. विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विधानभवन परिसरातील पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख नाल्यामध्ये पाणी तुंबल्याचे लक्षात येताच बागडे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना नाल्यात उतरण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाल्यात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होणाऱ्या प्रमुख पाइपच्या तोंडाशी साठलेला प्लास्टिक पिशव्या आणि दारूच्या बाटल्यांचा ढीगच बाहेर काढला. नाल्यात दारूच्या बाटल्याच सापडल्याने विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत.