आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र विदर्भासाठी महाआघाडीच्या हालचाली; योगेंद्र यादव यांची नागपुरात बंदद्वार चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सर्व विदर्भवादी संघटना एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. या महाआघाडीबाबत ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे आणि स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांची नागपुरात बंदद्वार बैठक झाली.  


सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते. पण भाजपने आपला शब्द पाळला नाही. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भाचे नंबर एकचे शत्रू आहेत, असे काही दिवसांपूर्वी श्रीहरी अणे म्हणाले होते. त्यामुळेच आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सर्व विदर्भवादी संघटनांची मोट बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या वेळी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक विदर्भाच्या मुद्द्यांवर एकत्र लढवण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.  


आम आदमी पार्टी, विदर्भ माझा पक्ष, विरा, सर्व रिपब्लिकन पक्ष, बसपा, शेकाप, योगेंद्र यादव यांचा स्वराज इंडिया पक्ष आणि विदर्भाच्या मागणीसाठी लढणाऱ्या संघटनांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. बंदद्वार झालेल्या या बैठकीत विदर्भवादी नेते श्रीहरी अणे, योगेंद्र यादव, अ‍ॅड. रवी संन्याल, संदेश सिंगलकर, गिरीश नांदगावकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत विदर्भवादी पक्षांना एका छताखाली आणून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीहरी अणेंनी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता विदर्भाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांना एकत्र आणून महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


भाजपला फटका बसण्याची शक्यता  
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात ६२ पैकी तब्बल ४४ विधानसभेच्या जागा जिंकता आल्या. लोकसभेतही भाजपला विदर्भात चांगले यश मिळाले. पण सत्तेत आल्यावर भाजपला विदर्भाचा विसर पडला. त्यामुळे आता विदर्भवादी संघटनांची महाआघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा आगामी निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात का होईना, फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...