आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्याच कागदपत्रांद्वारे घाेटाळ्याचे अाराेप, राजकीय अफवांना सडेतोड उत्तर देऊ : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 'विरोधक सरकारविरुद्ध अफवा पसरवत आहेत. पुरावे नसल्याने जुनीच कागदपत्रे दाखवून घाेटाळ्याचा अाराेप करत अाहेत. अफवा पसरवणे गुन्हा असला तरी राजकीय अफवांना सडेतोड उत्तर देऊ,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विराेधकांना दिला. १,७६७ कोटींच्या कथित भूखंड घाेटाळाप्रकरणी पाहिजे त्या चौकशीला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित हाेते. 


सिडकोची सेंट्रल पार्कसाठी राखीव २४ एकर जमीन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना विकली. बाजारभावानुसार १,७६७ कोटींची जमीन फक्त ३ कोटी रुपयांत पॅराडाइज बिल्डरच्या मनीष भतीजा यांना विकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला होता. या विषयावरच अधिवेशनात रान उठवण्याचा इशारा विराेधकांनी दिला अाहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जाेरदार पलटवार केला. 


भतीजांचे 'चाचा' कोण, ते सांगू
भूखंड घोटाळ्यात भतीजा यांचे नाव घेतले जात आहे. या भतीजांचे 'चाचा' काेण, ते सभागृहात सांगूच. शिवाय यापूर्वी कोणी-कोणी, कुठे-कुठे, काय-काय वाटप केले त्याचीही माहिती देऊ, असा गर्भित इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. पूर्वी शेतकऱ्यांना जमिनी विकता येत नव्हत्या. त्यामुळे ते न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना जमिनी विकण्याची परवानगी मिळाली. मुळात भूखंड सिडकोचा नसून राज्य सरकारचा आहे. भूखंड वाटपाचे अधिकार ३० वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांना असून ते सरकारकडे परत घेण्याचा अजिबात विचार नाही. आघाडी सरकारच्या काळात २०० शेतकऱ्यांनी जमिनी विकल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केला. 


नाणार प्रकल्प थोपवणार नाही
मुख्यमंत्री म्हणाले, नाणारप्रकरणी शिवसेनेची भूमिका आम्ही समजून घेतली असून प्रकल्प कोणावर थोपवणार नाही. हा प्रश्न चर्चेतून सोडवू. सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असली तरी चौकशी वेगाने सुरू आहे. हा वेग आणखी वाढवू. पावसाळी अधिवेशनात दुधासंबंधी समग्र धोरण आखण्यात येईल. सध्या दुधाच्या दरावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुधाबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, हे स्पष्ट केले. 


धुळे अफवाप्रकरणी कारवाई 
धुळे जिल्ह्यातील घटनेनंतर अफवांचे पेव फुटले आहे. अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी या संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. तेव्हा जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि खात्री केल्याशिवाय काेणीही मेसेज फाॅरवर्ड करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 


माझी पत्र परिषद, मीच बोलेन 
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प जाणार की राहणार, असा प्रश्न उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विचारण्यात आला. त्यावर पत्रकार परिषद माझी आहे, त्यामुळे मीच बोलणार असे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च उत्तर दिले. सुभाष देसाई या विषयावर स्वतंत्रपणे बोलतील, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...