आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणारप्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, विरोधकांनी गोंधळ घालत कामकाज बंद पाडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नाणार प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरी असलेली चढाअोढ गुरुवारी कायम राहिली. नाणार प्रकल्पाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, तो रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी या पक्षांच्या आमदारांच्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज गुरुवारी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब झाले. सरकारने नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी तिन्ही पक्ष अडून असल्याने शुक्रवारीही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 


नाणार येथील शेतकऱ्यांनी बुधवारी नागपुरात येऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने या मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासूनच शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नाणारचा मुद्दा पेटवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. गुरुवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही नाणारचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नियम ९७ अन्वये नाणारवर चर्चेसह मतदानाचा प्रस्ताव दिला होता. तो अध्यक्ष बागडे यांनी दालनातच फेटाळला होता. मात्र, तरीही नाणारवर चर्चा व्हावी आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रेटून धरली. या चढाअोढीत त्यांना शिवसेनेची देखील साथ मिळाली. नाणारवर भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही तर सभागृह चालू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या सदस्यांनीही दिला. 


शिवसेनेची फरपट सुरूच 
नाणारला विरोध असला तरी एरवी सभागृहात शांत दिसलेल्या शिवसेनेची या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरपट होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून गोंधळ सुरू झाल्यावर शिवसेनेचे आमदारही आपला विरोध दर्शवण्यासाठी सामील होतात, असेच चित्र गुरुवारी बघायला मिळाले. 


महत्त्वाची ४-५ विधेयके गोंधळातच केले मंजूर 
दोन्ही पक्षांच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येत प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच विधानसभेचे कामकाज चारदा तहकूब झाले. या दरम्यान, काही प्रश्नोत्तरे घेण्यात आली. चार ते पाच महत्त्वाची विधेयके गोंधळातच मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

बातम्या आणखी आहेत...