आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको भूखंडप्रकरणी पाणी मुरतेय हे मुख्यमंत्र्यांनाही पटले : छगन भुजबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नवी मुंबईतील वादग्रस्त सिडको भूखंड व्यवहारात कुठेतरी पाणी मुरते आहे, हे मुख्यमंत्र्यांनाही पटले असावे. म्हणूनच त्यांनी न्यायालयीन चौकशी होईपर्यंत भूखंड व्यवहाराला स्थगिती दिली, असा टाेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बाेलताना लगावला. तुुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रथमच नागपुरात अालेल्या भुजबळांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुलेंची पगडी घालून जल्लाेषात स्वागत केले. साेमवारापासून ते  पावसाळी अधिवेशनात हजेरी लावतील.  


‘सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी या भूखंड व्यवहारासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले. या वादग्रस्त भूखंडासोबतच आघाडी सरकारच्या काळातील अशाच प्रकारच्या २०० जमीन व्यवहारांचीही चौकशी करण्याची घोषणाही विधानसभेत केली आणि शुक्रवारी विधान परिषदेत जमीन व्यवहाराला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. काहीही चुकीचे झाले नाही तर मुख्यमंत्र्यांनी जमीन व्यवहाराला स्थगिती का दिली?,’ असा सवाल भुजबळ यांनी केला.   


सिडको भूखंड व्यवहार प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी योग्य उत्तरे द्यायला हवी होती. पण त्यांनी नेहमीच्या शैलीने आधी आरोप फेटाळून लावले आणि नंतर स्थगिती दिली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे काम अडचणीचे झाले आहे. आपले सारे वकिली कौशल्य त्यांना पणाला लावावे लागत आहे. नगरविकास, गृहविकास.... एकच मुख्यमंत्री तरी किती भूमिका वठवणार, असा सवाल भुजबळ यांनी केला.  


भिडेंनी वक्तव्याचा पुनर्विचार करावा   
मनू संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले अाहे. या वक्तव्याचा भिडेंनी पुनर्विचार करावा. नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या बहुजनांनी भिडेंसोबत राहायचे की नाही, याचा विचार करावा, असे भुजबळांनी स्पष्ट केले. महात्मा फुले यांनी मनुस्मृती जाळून टाकावी, असे आवाहन केले होते. डाॅ. आंबेडकरांच्या अनुयायांनी मनुस्मृती जाळली होती. त्यामुळे मनुस्मृतीचा धिक्कारच व्हायला हवा, असे भुजबळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...