आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाण्यावर प्रक्रियेचेे नवे तंत्रज्ञान; नद्या, जलाशय प्रदूषणमुक्तीसाठी वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नाल्यांमधील सांडपाणी नद्या आणि जलाशयांमध्ये यापुढे प्रक्रिया करूनच सोडले जावे यासाठी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) नवे तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा वापर आता देशभरात नद्या आणि जलाशयांच्या प्रदूषणमुक्तीसाठी केला जाणार आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगरसह अमृतसर, रायपूर, अलेप्पीसह दिल्लीतही हे तंत्रज्ञान लवकरच उभारले जाणार अाहे.   


नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. देशातील मेट्रोसह प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत केवळ ३० टक्केच सांडपाण्यावर प्रक्रिया  करणे शक्य होत असून उर्वरित सत्तर टक्के पाणी आजही नद्या, तलावांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. या जलस्रोतांच्या आसपास असलेल्या नागरी वस्त्यांनाही दुर्गंधीसह अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून उर्वरित सांडपाणी किमान खर्चात प्रक्रिया करून जलस्रोतांमध्ये सोडणे हा एकमेव पर्याय आहे. नीरीच्या वैज्ञानिकांनी त्यासाठी कमी खर्च व देखभालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. रिन्यू (रेस्टोरेशन ऑफ नल्हाह विथ इकॉलॉजिकल युनिट्स) विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान गंगा शुद्धीकरणासाठीही भविष्यात वापरले जाऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

कशी होईल नेमकी प्रक्रिया  

नीरीच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अर्बन मॅनेजमेंट डिव्हिजनचे प्रधान वैज्ञानिक डॉ. रितेश विजय म्हणाले, रिन्यू तंत्रज्ञानात रसायन, अतिरिक्त बांधकाम तसेच विजेची गरज नाही. चाळण्यांच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहासोबत आलेल्या वस्तू वेगळ्या केल्या जातात. पुढे जाणारे सांडपाणी सेडिमेंटेशनच्या प्रक्रियेतून जाऊन त्यातील अशुद्ध तत्त्व स्थिर करतात. तिसऱ्या टप्प्यात पाण्यातील अशुद्ध कार्बनसदृश तत्त्व खाणाऱ्या विशिष्ट जीवाणूंचा वापर केला आहे. चौथ्या टप्प्यात पाणी शुद्ध करणाऱ्या विशिष्ट जल वनस्पतींचा वापर केला आहे. सौरऊर्जा पॅनलचा वापर करून पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यात मदत मिळते. या संपूर्ण प्रक्रियेतून पाणी बऱ्यापैकी शुद्ध होते. सांडपाणी स्वच्छ होण्यासह पाण्यातील दुर्गंधीही घालवणे या तंत्रज्ञानाने पूर्णपणे शक्य होत आहे. धावत्या पाण्यातच संपूर्ण शुद्धीकरण यंत्रणा उभारली जात असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अडवण्याची गरज नाही.

 

उल्हासनगरसह दिल्ली, अमृतसरमध्ये उभारणी  
महाराष्ट्रातील उल्हासनगरसह अमृतसर, दिल्ली, रायपूर आणि अलेप्पी येथे लवकरच हे तंत्रज्ञान उभारले जाणार असून नागपुरात या तंत्रज्ञानाचा वापर शंभर टक्के यशस्वी ठरला असल्याची माहिती डॉ. राकेशकुमार यांनी दिली. अलीकडेच सेंटर फॉर सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. गिरीश सहानी यांनी नागपुरात उभारलेल्या या प्रकल्पाची पाहणी केली.

 

बातम्या आणखी आहेत...