आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिद्धपुरात मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम विदर्भ पदाधिकारी बैठकीसाठी आले असता स्थानिक कंवर नगरातील महानुभाव आश्रमाला भेट देत मुख्यमंत्री शनिवारी (दि.१४ ) चर्चेदरम्यान बोलत होते.

 

मराठी भाषेतील 'लीळाचरित्र' या पहिल्या ग्रंथाची रचना रिद्धपुरात झाली आहे. मराठी भाषेची पंढरी असलेल्या रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ व्हावे अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी कंवर नगर येथील महानुभाव आश्रमातील भेटीत मराठी विद्यापीठाबाबत सकारात्मकता दर्शवल्याने महानुभाव पंथीय तसेच मराठी साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिद्धपूर विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे येथील विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरु होतील. नांदेड येथील द्विज गोरक्षण मंदिरासाठी शासकीय समिती गठित करण्याच्या मागणीवरही निश्चित कार्यवाही होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आश्रमाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे लीळाचरित्राची प्रत, चांदीचे नारळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर महंत कारंजेकर बाबा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व विविध विषयांवर चर्चा केली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार डाॅ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, मोहन दादा अमृते, महानुभाव परिषद विश्वस्त अविनाश ठाकरे, रिद्धपूरनिवासी वाईनदेशकर बाबा आदी उपस्थित होते.

 

आमदार ठाकूर आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांचे सांत्वन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. तसेच आमदार श्रीकांत देशपांडे यांचे वडील तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी गोविंदराव देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले.

 

राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन न घेतल्याने हिरमोड
नागपूर येथून माेटारीने येणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाणार असल्याची चर्चा होती. शुक्रवारपासून समाधी मंदिरात पोलिसांचा ताफा कायम हाेता. गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी थांबत राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन न घेतल्याने भक्तांचा हिरमोड झाला. शिवाय दोन तास समाधी व प्रार्थना मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवल्याने भक्तांमध्ये संताप दिसून आला.

 

बातम्या आणखी आहेत...