आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम व द्वितीय सत्रात अनुत्तीर्ण तरी मिळेल बिफार्मच्या तिसऱ्या सत्राला प्रवेश; विद्यापीठ प्राधिकरणाचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रथम वर्षाच्या प्रथम, द्वितीय सत्रात अनुत्तीर्ण असले तरी औषध निर्माणशास्त्राच्या (बिफार्म) विद्यार्थ्यांना तृतीय सत्राला प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचे नुकसान होऊ नये म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राधिकरणाने हा निर्णय घेतला. औषध निर्माणशास्त्राचा नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून सुरु झालेला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी प्रथम वर्षाचे प्रथम व द्वितीय सत्र अनुत्तीर्ण असले तरी त्यांना द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राला नवीन अधिसूचनेनुसार प्रवेशित होता येणार आहे. 


विद्यार्थी तृतीय वर्षात पाचव्या सत्राला प्रवेश घेईल. त्यावेळी त्याला अभ्यासक्रमाची प्रथम, द्वितीय सत्राची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. त्यांना तृतीय वर्षांच्या पाचव्या सत्राला प्रवेशित होता येणार नाही. विद्यार्थी तृतीय वर्षाचे पाचवे व सहावे सत्र अनुत्तीर्ण असला तरी चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राला प्रवेशित होताना प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ सत्र परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला बंधनकारक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राला प्रवेश मिळू शकणार नाही. अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राची परीक्षा उत्तीर्ण होताना इतर सत्रांच्या परीक्षा जोपर्यंत तो उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत त्याचा आठव्या सत्राचा निकाल जाहीर होणार नाही, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला. औषध निर्माणशास्त्र पदवी परीक्षेसंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाने प्रकाशित केलेली अधिसूचना क्र. ५८/२०१८ २८ जून २०१८ मध्ये दिलेली आहे. अधिसूचना विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. 


द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील सत्राकरीता सुट
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचे नुकसान होऊ नये म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार डी.फार्म. परीक्षा उत्तीर्ण होवून औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना पुढील सत्राकरीता ही सुट मिळणार आहे. चार वर्षीय पदवी परीक्षेकरिता द्वितीय वर्षाला थेट प्रवेश दिल्या जातो. असे विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या तृतीय व चतुर्थ सत्राची परीक्षा अनुत्तीर्ण असले तरी त्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या व सहाव्या सत्राला प्रवेशित होता येणार आहे. याशिवाय चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राला प्रवेशित होताना द्वितीय वर्षाच्या तृतीय व चतुर्थ सत्र परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. त्याशिवाय त्याला सातव्या सत्राला प्रवेश मिळणार नाही. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...