आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'व्हॅलेंटाइन डे'ला उत्साह नसल्याने फुले कोमेजली, खरेदीसाठी दुकानातही दिसली नाही तरुणाईची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - तरुणाईच्या दृष्टीने 'व्हॅलेंटाइन डे'ला विशेष महत्त्व आहे. विशी-पंचविशीत 'प्रेमा'साठी वाट्टेल ते करणाऱ्या तरुणाईचा हा उत्सव. परंतु, यावर्षी शहरात तरुणाईच्या प्रेमाचा जोश काही महाविद्यालये वगळता रस्त्यांसह बगिच्यांमध्ये काही ओसंडून वाहू शकला नाही. त्यामुळे बाजारात मागणीच नसल्याने गुलाबाची फुलेही कोमेजून गेली.

 

अलीकडच्या काळात विविध 'डे' साजरी करण्याची प्रथाच झाली आहे. त्यातच 'व्हॅलेंटाइन डे' मोठ्या प्रमाणात तरुणाईकडून साजरा केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र विविध संघटनांकडून याला होणारा विरोध, रस्त्यावर होणारी हाणामारी, प्रेमप्रकरणातून निर्माण होणारे तणाव यासारख्या गंभीर घटना शहरात घडून गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात आज 'व्हॅलेंटाइन डे'चा उत्साह नगण्य दिसून आला. काही महाविद्यालयांमध्ये मात्र या पार्श्वभूमीवर जोश दिसला. ड्रेसकोडसह चॉकलेट्स घेऊन विद्यार्थी रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात फिरत होते.


यामुळे दिवसभर महाविद्यालयांमध्ये चैतन्य दिसून आले. एरवी शहरातील छत्री तलाव, वडाळी गार्डन, विशेषत: बांबू गार्डन परिसरात प्रचंड गर्दी असते. मात्र नेमक्या 'व्हॅलेंटाइन डे'ला या ठिकाणी शुकशुकाट व पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान बाजारात गुलाबाच्या फुलालाही फारशी मागणी नसल्यामुळे विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. 'व्हॅलेंटाइन डे'ला रग्गड नफा मिळवून देणाऱ्या गुलाबाची फुले विक्रेत्यांना पाच ते दहा रुपये तोट्याने विकावी लागली. त्यातच अल्प विक्री झाल्याने खरेदी करून ठेवलेले फुले दुकानातच पडून राहिल्याचे दिसून आले. बहुतेक ठिकाणी सामाजिक संघटनांच्या पुढाकारामुळे मैत्रीदिनाला मातृ-पितृ पूजन करण्यात आले. विनाशकारी पाश्चात्य संस्कृतीची देणं असलेल्या व्हॅलेंटाइन डे ऐवजी हा दिवस आई-वडिलांची पूजा करून साजरा करावा असे आवाहन करण्यात आले हाेते. यासंदर्भात प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन त्यातून तरुणाईवर संस्कार करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम, पोलिसांची गस्त आणि काही संघटकांच्या दहशतीचा संयुक्त परिणाम शहरातील एकूण व्हॅलेंटाइन डेवर दिसून आला. सर्वत्र शुकशुकाट होता.

 

पाच रुपये तोटा सहन करुन केली गुलाबाची विक्री
'व्हॅलेंटाइन डे' निमित्त दहा हजार रुपयांची फुले खरेदी केली होती. परंतु दिवसभरात केवळ ४० फुले विकली गेली. मी २५ रुपये नगाने फुले खरेदी केली परंतु मागणीच नसल्याने २० रुपये नगाने विकावी लागली.
- विजय काळे, फुल विक्रेता

 

बातम्या आणखी आहेत...