आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनातील आमदार निवासातील कामे संशयाच्या भोवऱ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. बुधवार २७ जूनपासून दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे कामाची गती वाढविण्यात आली आहे. रविभवन, नागभवनसह आमदार निवासातही भराभर कामे करण्यात येत आहे. मात्र आमदार निवासातील कामे ४५ टक्के कमी दराने निविदा भरून करण्यात येत असल्यामुळे संशयाला वाव मिळला आहे. 


आमदार निवासातील बहुतांश कामाच्या निविदा ४५ टक्क्यांपर्यंत कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्लास देबडवार यांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. नागपूर करारांतर्गत दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. त्यातही हिवाळी अधिवेशन ही नागपूरची ओळख झाले आहे. २०१७ च्या डिसेंबरमध्येही येथेच हिवाळी अधिवेशन झाले. मात्र, मुंबईच्या मनोरा आमदार निवासाचे नव्याने बांधकाम होत असल्याने यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जूनच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत अधिवेशनाची तयारी सुरू केली. 


आमदार निवासात आमदारांसाठी आवश्यक सोयी केल्या जात आहेत. मात्र, आता हेच काम संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पेंटिंग, कामगारांचा पुरवठा, पॉलिशिंग यासह पाणी पुरवठ्यासारखी महत्त्वपूर्ण कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जात आहेत. ही सर्व कामे निविदेच्या निश्चित दरापेक्षा ४५ टक्के कमी दराने देण्यात आली आहेत. त्यामुळे इतक्या कमी दरात करण्यात येत असलेल्या कामाच्या गुणवत्तेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवास चकाचक करण्यात आले होते. पडदे, चादर, गाद्या बदलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा सहा महिन्यांनी तेच काम केले जात आहे. 


चौकशी करून अहवाल देणार 
मुख्य अभियंत्याच्या आदेशावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक निविदेची कागदपत्रे कनिष्ठ अभियंत्याकडून मागविण्यात आली आहेत. या निविदांची पडताळणी केली जाईल. लवकरच मुख्य अभियंता यांना अहवाल सादर केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...