आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ठिकाणी नाव असलेल्या १० हजारांवर मतदारांना 'नोटीस'; बोगस मतदान करणे अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- एकाच विधानसभा क्षेत्रात दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असलेल्या जिल्ह्यातील तब्बल १० हजारांपेक्षा जास्त मतदारांचा शोध निवडणूक विभागाकडून घेण्यात आला असून या सर्व मतदारांना निवडणूक विभागाकडून नोटीस बजावण्यात येत आहेत. निवडणूक विभागाने एका नवीन सॉफ्टवेअरच्या मदतीने ही नावे शोधून काढली असल्याने आता निवडणुकीदरम्यान बोगस मतदान करणे अशक्य होणार आहे. 


येत्या काही महिन्यात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशावरून मतदार याद्यांचे शुद्धीकरण व प्रमाणिकरणाचे काम प्रत्येक विधानसभा मतदार संघाअंतर्गत करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमात १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पुर्ण करणाऱ्या मतदारांची नोंदणी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थालांतरीत मतदारांच्या नावाची नोंद कमी करणे, तसेच मतदार यादीत कृष्णधवल छायाचित्रे असलेल्यांचे रंगीत फोटो जमा करणे, तसेच मतदार यादीत नावांमध्ये तथा इतर बाबींमध्ये दुरुस्ती करणे ही कामे करण्यात येत आहेत. मात्र यंदा या कामाव्यतिरिक्त ज्या व्यक्तीचे नाव दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नोंद आहे त्यांचा शोध घेऊन केवळ एकाच ठिकाणी त्यांचे नाव कायम ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. 


यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर निवडणूक यादीतून दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी असलेले एकच नाव शोधून काढत आहे. या सॉफ्टवेअरने शोधून काढलेल्या अशा दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना निवडणूक विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात येत आहे. त्यात त्यांना पाचारण करुन त्यांचे नाव केवळ एकाच ठिकाणी कायम ठेवून इतर ठिकाणी असलेले त्यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात येणार आहे. एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी मतदार यादीत असल्याने त्यांच्या नावावर बोगस मतदान करण्याचे प्रकार घडत होते. त्यातही ज्या नावापुढे फोटो नाही अशा नावावर बोगस मतदान होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र आता एका मतदाराचे नाव एकाच ठिकाणी मतदार यादीत कायम राहणार आहे. सोबतच ज्या मतदारांचे रंगीत फोटो उपलब्ध होणार नाहीत त्यांची नावेही मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदानावर १०० टक्के आळा घालणे शक्य होणार आहे. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. 

 

नवीन सॉफ्टवेअरद्वारे फोटोही होणार 'मॅच' 
या नवीन कार्यक्रमाअंतर्गत काम करीत असलेले नवीन सॉफ्टवेअर निवडणूक मतदार याद्यांमध्ये केवळ दोन किंवा तीन ठिकाणी असलेले एकाच व्यक्तीचे नावच शोधून काढत नाही तर या सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या मतदाराचे फोटोही मॅच करुन पाहण्यात येतात. त्यामुळे काही ठिकाणी नावे वेगवेगळी असलेल्या मात्र फोटो एकच असलेल्या मतदारांचा शोध घेणेही यामुळे आता शक्य झाले आहे. 


१३ हजारांवर कार्ड प्राप्त 
निवडणूक विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या निवडणूक कार्डांपैकी सुमारे १३ हजार कार्ड प्राप्त झाले आहे. या कार्डांचे वाटपही सुरू करण्यात आले आहे. त्यासोबतच नवीन नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांचे कार्ड तयार करण्याचे कामही नवीन कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. 


मतदारांनीही आपले कर्तव्य पाळावे 
मतदार यादीतील दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत हजारो मतदारांना नोटीस बजावण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त तहसील कार्यालयात मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मतदारांनीही आपले कर्तव्य पाळून त्या यादीत आपले नाव योग्य आहे की, नाही याची पाहणी करुन सर्व चुका दुरुस्त करुन घ्याव्या.
- सचिन शेजाळ, तहसीलदार, यवतमाळ. 


बीएलओ जाणून घेणार मतदारांच्या समस्या 
या नवीन कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वत: घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत. त्यात मतदारांच्या सर्व अडचणी त्यांना सोडवाव्या लागणार आहे. या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर यावेळी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...