आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जादू'आणि 'राजा' बोगस बीटी बियाण्यांची १ लाख पाकिटे जिल्ह्यात विक्रीसाठी उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील वर्षी गुलाबी बांेड अळीने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान केले असताना यंदाही "जादू'आणि "राजा' नामक वाणाच्या कपाशीच्या बोगस बीटी बियाण्यांची १ लाख पाकिटे जिल्ह्यात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी सोमवारी जिल्हा परिषद आमसभेत केल्यानंतर सभागृहात खळबळ उडाली. त्यानंतर लगेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तसेच भुयार यांच्यासह सभागृहाच्या मागणीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाच सदस्यीय चौकशी समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. या समितीला सर्वाधिकार असतील अशी घोषणा केली. 


भुयार यांनी कपाशीच्या बोगस बीटी बियाण्यांची 'जादू'आणि 'राजा' नामक वाणाची दोन पाकीटे हाती धरून सभागृहाला उंचावत अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही दाखवली. सोबतच ही पाकिटे जिल्ह्यात आलीच कशी याची चौकशी करण्यात यावी, कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी बोगस बियाणे विक्रेत्या केंद्रांना पाठिशी घालत असून त्यांच्यात साठगाठ असल्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोपही त्यांनी केला. सोबतच या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीही केली. 


यानंतर सदस्य प्रकाश साबळे यांनीही जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना बोगस बीटी बियाणे मिळाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचवेळी माजी जि.प.अध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी चौकशी समिती नियुक्त करून तत्काळ कारवाई करावी. शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दोषींची गय केली जाऊ नये. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी विशेष आमसभा बोलावून कारवाई करावी, असा आग्रह धरला. 


सुमारे अर्धा तास बोगस बीटी बियाण्यांमुळे सभागृहातील वातावरण तापले होते. या प्रकरणी जि.प.अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर तसेच चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा केल्यानंतरच वातावरण शांत झाले. यानंतर सभा गुंडाळण्यात आली. मात्र त्यानंतरही जि.प. आवारात बोगस बीटी बियाण्यांवर खमंग चर्चा सुरू होती. भुयार यांनी तर कृषी विकास अधिकाऱ्यांना मी आता या प्रकरणी जाब विचारणार अशी भूमिका घेतली आहे. 


५ हजार लोकसंख्येवरील गावांसाठी जनसुविधा निधीची मागणी 
जिल्ह्यातील ज्या गावांची लोकसंख्या ही ५ हजारावर आहे, त्यांना जनसुविधा निधी देण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केल्यानंतर तत्काळ निधी देण्यात यावा, अशा सूचना जि.प.प्रशासनाला अध्यक्षांद्वारे करण्यात आल्या. यानंतर खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून प्रथमच निधी आला असून त्यासाठी सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी त्यांच्या सर्कलसाठी २ लाख रु.ची मागणी केली. त्यावर बबलू देशमुख यांनी प्रत्येक सदस्याला २ लाख देण शक्य नाही ५० हजार देता येईल, असे मत व्यक्त केले. यादरम्यानच करजगाव अन् धामक येथील शिकस्त इमारती पाडण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तिकडे धारणीत ५० ते ६० शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. तेथील ५०० शिक्षक बदली घेऊन निघून गेले त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ शकते असे सदस्य पटेल यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी ८ दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान,आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये पसंतीक्रम न मिळाल्याने अनेक शिक्षकांनी रविवारी शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच महिला शिक्षकांना अतिदुर्गम व गैरसोयीच्या ठिकाणी नियुक्ती देऊ नये,असे शासनाचे आदेश असल्याचा दाखला देत शिक्षक संघटनांनी मेळघाटमधील नियुक्तींना विरोध दर्शवला आहे,हे येथे उल्लेखनीय. 

 

कृषी अधिकारी अशी भाषा करतातच कशी? 
जिल्ह्यातील बोगस बीटी बियाणे विक्रेते शोधणारी आमचे कृषी अधिकारी कार्यालय पोलीस यंत्रणा नाही. तक्रार केली तर कारवाई करू, असे उत्तर कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी दिल्यानंतर सभागृहातील काही सदस्य संतापले. कृषी विकास अधिकारी काेणाशी बोलताहेत याची त्यांना जाणीव नाही काय? जिल्हा परिषद सदस्यांना ते तक्रार द्या असे म्हणतात. त्यांचे काहीच कर्तव्य नाही काय? शेतकऱ्यांची काळजी करणे हे केवळ जि.प.सदस्यांचे काम आहे काय? अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीच घेणे-देणे नाही काय? असा प्रश्नांचा मारा करीत, जर अशी भाषा कृषी विकास अधिकारी करीत असतील तर त्यांना आम्हाला वठणीवर आणता येते, असा इशाराही सभागृहाने दिला. त्यामुळे भविष्यात हा मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत. 

 

कोण , काय म्हणाले? 
कृषी विभागाच्या संगनमताने विक्री 

गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होत आहे. बोगस जय किसान खतही विकले जात असून यालाकृषी विभाग कारणीभूत आहे.संगनमताने ही विक्री सुरू आहे. 
- देवेंद्र भुयार, जि.प. सदस्य. 


दोषींची कदापि गय केली जाणार नाही 
बोगस बीटी बियाणे विक्री प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेत नियुक्त केली जाणार आहे. यात जि.प.उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश असेल. दोषींची अजिबात गय केली जाणार नाही. 
- नितीन गोंडाणे, अध्यक्ष जि.प. 

बातम्या आणखी आहेत...