आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने आता भाजपचे मंगळसूत्रच घालून घ्यावे; विरोधी पक्षांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकऱ्यांना भरपाई, कर्जमाफी, कर्जवाटप, कायदा सुव्यवस्था, प्लास्टिक बंदी अशा अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या पाठीशी शिवसेना सावित्रीप्रमाणे उभी असल्याने फडणवीस सरकार टिकून असून शिवसेनेने आता भाजपचे मंगळसूत्रच गळ्यात घालावे, अशी टीका करत विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. 


सरकारच्या अपयशावर दोन्ही सभागृहांत वाचा फोडून जाब विचारणार, असा इशारा देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जनतेला फिटनेस चॅलेंज देणारे भाजप सरकारच जनतेच्या समस्या सोडवण्यात अनफिट ठरल्याचे सांगितले. कर्जमाफी, नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक झाली. राज्याच्या इतिहासात कधी नव्हे ते १८ टक्केच खरिपाचे नवे पीक कर्जवाटप झाले. सरकारनेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याने बँकेचे अधिकारी आता शेतकऱ्यांची अडवणूक करून मस्तवालपणे वागत आहेत. मागील वर्षभरात २७०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असताना सरकार कुठेही गंभीर नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना शिवसेना शेतकरी मोजणार होती. त्याचे काय झाले? असा सवालही विखे यांनी केला. 


कायदा व सुव्यवस्था शिल्लकच राहिली नाही 
जळगावात ५ जणांची हत्या, औरंगाबाद दंगल, नगर हत्याकांड, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील गुन्हेगारी घटना पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लकच नसून हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. मंत्र्यांना मुख्यमंत्री सातत्याने पाठीशी घालत असून अलीकडेच सहकारमंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांना माफ केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...