आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडेंच्‍या आंब्‍यानंतर रामदेवबाबांचे पुत्रजीवक बीज परिषदेत गाजले, विरोधकांची कारवाई करण्‍याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अधिवेशनात संभाजी भिडे गुरुजी यांचे हमखास पुत्रप्राप्ती करून देणारे आंबे खूप गाजले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी भिडेंच्या वेशभूषेत विधानभवन परिसरात येऊन भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तेही खूप गाजले. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रामदेवबाबांच्या पतंजली हर्बलच्या पुत्रजीवक बीजाचा मुद्दा पुढे आला आणि आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी बाबा रामदेव पतंजली हर्बलचे उत्पादन असलेले पुत्रजीवक बीज औषधाचे पाकीट परिषदेत सादर करून कारवाई करण्याची मागणी केली. 

 

पुत्रजीवक बीज रामदेवबाबांच्या फार्मसीचे औषध आहे. पाकिटावर "वीर्यवर्धक व गर्भस्थापक के रूप मे लाभप्रद' असे लिहिले आहे. यामुळे मुले होतात, असा दावा ते करतात. अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट येथे आहेत. त्यांनी सभागृहात निवेदन करून या औषधाचा साठा जप्त करावा, अशी मागणी दत्त यांनी केली. एकीकडे पंतप्रधान "बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा नारा देतात, तर दुसरीकडे बाबा रामदेव पुत्रप्राप्ती करणारे औषध काढतात, हे चाललेय काय, असा सवाल दत्त यांनी केला. 


बाबांना जमिनीच्या मुद्द्यावर आगपाखड 
रामदेवबाबांना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीचा मुद्दा शुक्रवारीही सभागृहात उपस्थित झाला. बाबा रामदेव यांना कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावाने दिली, असा आरोप संजय दत्त यांनी केला. त्यावर गिरीश बापट यांनी विरोधकांनाच फैलावर घेतले. या राज्यात कोट्यवधी एकर जमीन कुणीकुणी, कशी, कुठे लाटली हे पटलावर ठेवीन, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. 


बापटांचे आधी वंदन, मग बाबांना समर्थन 
दत्त यांच्या प्रश्नाच्या उत्तरात अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी, 'प. पू. रामदेवबाबांना वंदन करून' अशी सुरुवात केली. त्यावर विरोधी बाकावरून हुल्लडबाजी झाली. रामदेवबाबा व संजयबाबा दोघेही माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. सभागृहात संजयबाबांना न्याय द्यायचा असून बाहेर नेहमीच रामदेवबाबांना न्याय देतो. रामदेवबाबा आदर्श असून कुठलेही बेकायदेशीर काम करत नाहीत. तरीही दत्त यांच्या मागणीनुसार चौकशी करू व बेकायदेशीर असेल तर कारवाई करू, असे बापट म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...