आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांच्या ९३ जागांसाठी २ हजार ३४८ उमेदवारांनी आजमावले नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ग्रामीण पोलिस दलाच्या ९३ जागांसाठी १२ मार्चपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली होती. ९ एप्रिलला मैदानी चाचणी पूर्ण होताच लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित झाली होती. दरम्यान १२ एप्रिलला सकाळी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी गुरुवार, १२ एप्रिललाच उशिरा रात्रीपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भरती प्रक्रियेची गुणवत्ता यादी आगामी दोन ते तीन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

ग्रामीण पोलिस दलात ९३ जागांसाठी २६ हजार उमेदवारांचे अर्ज आले होते. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे ग्रामीण पोलिस दलाने दररोज आठशे ते हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले होते. त्यामुळे १२ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. यावेळी प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी १२२३४ पुरुष तर ३ हजार १४ महिला उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली होती. मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० गुणांची आवश्यकता होती. दरम्यान, १२२३४ उमेदवारांपैकी १० हजार १९३ तर महिलांपैकी ११७२ उमेदवारांनी मैदानी चाचणीत ५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेतले. मात्र लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी १५ उमेदवारांना बसवण्याची अट असल्याने मैदानी चाचणी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या ११ हजारांवर असली तरीही लेखी चाचणीसाठी २५०२ उमेदवार पात्र ठरले होते त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या ४३४, तर पुरुष उमेदवारांची संख्या २ हजार ६८ होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता येथील जोग स्टेडियमवर लेखी परीक्षेला २५०२ उमेदवारांपैकी २३४८ उमेदवारांनी हजेरी लावली होती. दीड तास वेळेचा व शंभर गुणांची ही लेखी परीक्षा होती. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ च्या दरम्यान 'अॅन्सर की' जाहीर झाली होती. विशेष म्हणजे गुरुवारी रात्रीपर्यंतच परीक्षेत उमेदवाराला मिळालेले गुणही जाहीर होणार आहे. त्यादृष्टीने तत्परतेने उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लवकरच अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे.

 

एसआरपीएफसाठी १४०७ जण लेखीस पात्र
एसआरपीएफला ५१ जागांसाठी १६ एप्रिलला सकाळी ७ वाजता एसआरपीएफच्याच मैदानावर लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांनी पहाटे ५ वाजताच मैदानावर हजर रहावे, या लेखीसाठी १४०७ उमेदवार पात्र झाल्याची माहिती एसआरपीएफचे समादेशक महेश चिमटे यांनी दिली.

 

आगामी दोन ते तीन दिवसात गुणवत्ता यादी
आम्ही गुरूवारी सकाळी झालेल्या परीक्षेची अॅन्सर की गुरूवारी सायंकाळी जाहीर केली असून या परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी गुरूवारी रात्रीपर्यंत जाहीर करणार आहोत. तसेच त्यानंतर आगामी दोन ते तीन दिवसात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
- एम. एम. मकानदार, अप्पर पोलिस अधीक्षक.

बातम्या आणखी आहेत...