आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति हव्यासापोटी अडकला शैलजांचा हत्यारा, 5 हजारांसाठी घेतला घरमालकिनीचा भाडेकरूने जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जलाराम नगरमध्ये निवृत्त शिक्षिका शैलजा निलंगे यांचा खून झाल्याचे बुधवारी समोर आलेे. या खून प्रकरणातील मारेकरी शैलजा निलंगे यांच्या घरात राहणारा भाडेकरूच निघाला. विशेष म्हणजे त्यानेच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शैलजा यांच्याबाबतीत सर्व माहिती दिली. त्यामुळे त्याच्यावर सुरुवातीला संशय नव्हता, मात्र पोलिसांनी दस्तूर नगरमधील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी हा भाडेकरू युवक व त्याच्या विवाहित प्रेयसीने एका एटीएममधून एकदा रक्कम काढल्यावरही ते वेगवेगळ्या एटीएमवर दिसले. त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री त्यांना अटक केली. या दोघानांही ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.

 

धीरज अरुण शिंदे (२४, रा. अासेगाव पूर्णा) असे मारेकऱ्याचे नाव आहे. गुन्ह्यात त्याला सहकार्य केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी विवाहित प्रेयसी अश्विनी रवी वानखडे (२२) हिला अटक केली. धीरज शिंदे हा १३ डिसेंबर २०१७ पासून निलंगे यांच्या घरात भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याला निलंगे यांच्या आर्थिक स्थितीची पूर्णपणे माहिती होती.

 

निलंगे या एकट्याच घरी राहायच्या. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास धीरज यांनी निलंगे यांचे दरवाजा ठोठावून पाणी मागितले. त्यावेळी निलंगे या भावासोबत फोनवर बोलत होत्या. पाणी घेतल्यानंतर याने निलंगे यांना पाच हजार रुपये मागितले. मात्र त्यांनी देण्यास नकार दिला व त्यावेळी या दोघांचा वाद झाला. याचवेळी त्याने निलंगे यांना बाजूलाच असलेल्या लाकडी पलंगावर लोटले व त्याच ठिकाणी असलेल्या उशीने नाक व तोंड दाबून ठेवले. त्यांचा प्राण गेल्याची खात्री झाल्यावर त्याने निलंगे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, कानातील सुवर्णालंकार तसेच १० हजारांची रोख व एटीएम कार्ड घेऊन मागील बाजूचा दरवाजा उघडून स्वत:च्या खोलीत आला. त्यानंतर त्याने अश्विनीला फोन करून पहाटे फरशी स्टॉप परिसरात बोलावले.


पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी हे दोघे चौकात भेटले. त्यानंतर धीरजने एका खासगी बँकेच्या एटीएममधून दहा - दहा हजार असे चार वेळा काढले. मात्र त्याचा पैशांचा मोह संपला नव्हता. त्यानंतर बाजूलाच असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये गेला व पुन्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ४० हजार निघाल्यामुळे नंतर रक्कम मिळाली नाही. त्यानंतर त्याने ५० हजारांची रोख व दागिने अश्विनीकडे देऊन तिला पाठवले व तो परत घरी आला. त्यानंतर काही वेळाने त्यानेच आरडाआेरड करून नागरिकांना गोळा केले. काही वेळानंतर पोलिस पोहोचले, त्यावेळी धीरजनेच पोलिसांना निलंगे यांच्या बाबतीत माहिती दिली. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. त्यावेळी धीरजलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला, मात्र त्याच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी ठोस पुरावे नव्हते. यातच पोलिसांनी फरशी स्टॉप परिसरातून सीसीटीव्हीचे फुटेज घेतले व त्यामध्ये धीरज हा एटीएममध्ये व एटीएमबाहेर अश्विनीसोबत चालताना दिसल्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला.

 

ज्येष्ठ नागरिकांनी माहिती द्यावी
शैलजा निलंगे यांचा मारेकरी भाडेकरूच निघाला आहे. याचवेळी त्याच्यामागे कुणी आहे का व इतरही दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीने नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन तशी माहिती द्यावी तसेच त्यांच्या घरात कामासाठी असलेल्या व्यक्तींचीही माहिती द्यावी.
- दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त.

 

धीरजच्या मागे कुणाचं डोकं?
धीरजने पोलिसांनी सांगितले की, त्याला पाच हजार रुपये मिळाले नाही म्हणून त्याने खून केला. मात्र निलंगे यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल अर्धा कोटी रुपयांची रोख असल्याची माहिती पोलिसांच्याच तपासात पुढे आली. त्यामुळे या प्रकरणात धीरजने केलेल्या खुनामागे नेमकं त्याचच डोकं आहे का, किती दिवसांपासून त्याने निलंगे यांच्या हत्येचा कट रचला? याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचा सर्व दिशेने तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...