आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक, आंदोलन मागे घ्या : शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकार नेहमीच सकारात्मक आहे. वाढीव तुकड्यांसह विविध मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले. 


ते म्हणाले, 'कायम' शब्द वगळण्यात आल्यानंतर अनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आणि तुकड्यांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार १ आणि २ जुलै २०१६ रोजी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अनुदानास पात्र करण्यात आल्या आहेत. या शाळांना आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान देण्याबाबतची पुरवणी मागणी मागील अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे. शिवाय उच्च माध्यमिक विद्यालयांना २० टक्के अनुदान, जुलै २०१६ नंतरच्या उर्वरित सर्व अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांच्या मूल्यांकनानंतर अनुदानास पात्र घोषित करणे, तसेच ज्या शाळांना यापूर्वीच २० टक्के अनुदान सुरू आहे, अशा शाळांना पुढील टप्प्यातील अनुदान अदा करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 


कृती समितीसोबत तावडेंची चर्चा 
राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने २० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षणमंत्री तावडे यांची मोर्चातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली होती. तावडे यांनी मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी विधान परिषदेत निवेदन करून विविध शिक्षक संघटनांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...