आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. जैमिनी कडू यांचे नागपुरात निधन; बहुजन चळवळीचे नेते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बहुजन चळवळीतील नेते व विचारवंत प्रा. जैमिनी कडू (६६) यांचे शनिवारी नागपुरात एका खासगी रुग्णालयात निधन झाले.  एका अपघातात जखमी झालेल्या प्रा. कडू यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते.  नागपुरातील मथुरादास मोहता महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केलेले प्रा. कडू बहुजन चळवळीत सक्रिय होते. विद्यार्थिदशेत विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात सक्रिय राहिलेले प्रा. कडू यांचा भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  निर्मितीच्या आंदोलनात मोठा वाटा होता. मंडल आयोगाची अंमलबजावणी, हुंडाविरोधी आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आंदोलने, सत्यशोधक समाजाच्या आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता. विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय सत्यशोधक समाज, राष्ट्रीय युवा साहित्य समाज, संत तुकाराम साहित्य परिषद, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड अशा अनेक संघटनांशी ते जुळलेले होते. नव्वदच्या दशकात त्यांनी पत्रकारितेतही उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. ५ मार्चला वर्धा मार्गावर त्यांच्या दुचाकीला ओला कॅबची धडक लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.  तेव्हापासून त्यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शैल जैमिनी, मुलगा संघर्ष व परिवार आहे. उद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...