आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEED निवडणुकीची माहिती अबू जुंदालला देण्यास माहिती अायाेगाने दिला नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -  बीड नगरपालिकेच्या निवडणुकीतील विजयी, पराभूत उमेदवारांची माहिती ‘अारटीअाय’अंतर्गत मागणारा २६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याचे अपील माहिती अायाेगाने फेटाळून लावले.  ‘दहशतवाद्यांना मिळालेली कुठलीही माहिती ते देशाच्या सुरक्षेला वा सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे शिक्षा झालेल्या अशा दहशतवाद्यांना माहिती अधिकारांन्वये कुठलीही माहिती देता येणार नाही,’ असा  निकाल राज्य माहिती आयुक्तांच्या नागपूर खंडपीठाने दिला अाहे. 

 
माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी हे अपील फेटाळून लावताना माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ पोटकलम १ (क) मधील तरतुदींचा उल्लेख केला असल्याची माहिती अायाेगातील सूत्रांनी दिली. यात ‘देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल तथा अपराधाला चिथावणी मिळेल, अशी माहिती पुरवण्याचे बंधन असणार नाही’, असे नमूद केले आहे. बीडचा रहिवासी असलेला अबू जुंदाल वेरूळ (जि. अाैरंगाबाद) शस्त्रतस्करी व मुंबईतील २६/११ प्रकरणातील मुख्य अाराेपी असून सध्या मुंबईच्या कारागृहात अटकेत अाहे.

 

कारागृहातूनच त्याने बीड नगरपालिकेस माहिती अधिकारान्वये अर्ज करून निवडणुकीविषयी माहिती मागितली होती. या माहितीत प्रामुख्याने बीडमधील जुनाबाजार, कागदीवेस, खासबाग, हत्तीखाना आणि हाफिज गल्ली या विशिष्ट भागात १९८० पासून आतापर्यंतच्या विजयी व पराभूत  उमेदवारांची माहिती मागविली होती. मात्र, ही माहिती मागविताना त्यात वॉर्ड अथवा आर्थिक वर्षांसंबधीचा कुठलाही उल्लेख नसल्याने नगरपालिकेने माहितीचा कुठलाही बोध होत नसल्याचे तांत्रिक कारण देत माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यावर जुंदालने प्रथम अपील दाखल केले

 

. या अपिलावरील सुनावणीत माहिती अधिकाऱ्यांनी माहिती मागविताना अर्जात प्रभाग अथवा वॉर्ड क्रमांक आणि कालावधीचा उल्लेख आवश्यक असल्याचे सांगत ते निकाली काढले होते. त्यामुळे जुंदालने दुसरे अपील माहिती आयोगाकडे दाखल केले होते. या अपिलाच्या सुनावणीत माहिती अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाची माहिती ठेवली जात नसल्याचे स्पष्ट केले होते. प्रभाग, वॉर्ड रचना बदलल्या गेल्याने अर्जदाराच्या मागणीच्या स्वरूपात माहिती देता येणार नाही, असेही नमूद केले होते. माहिती अधिकाऱ्यांचा हा दावा आयोगाने योग्य ठरवला.  

 

‘देशहितासाठी फेटाळला अर्ज’
‘अर्जदार हा मकोका कोर्टाने शिक्षा सुनावलेला शिक्षाधीन बंदी आहे. मुंबई हल्ला प्रकरणातही तो बंदी आहे. देशाबाबत मिळालेली माहिती दहशतवादी देशविघातक कृत्यासाठी वापरतात, हे यापूर्वी स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे देशहितास्तव अशा व्यक्तीला कुठलीही माहिती पुरवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत माहिती अायाेगाच्या नागपूर पीठाने अौरंगाबादेतील शिबिरात अतिरेकी अबू जुंदाल याचे अपील फेटाळले.

 

बातम्या आणखी आहेत...