आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचाच बोलबाला; विदर्भात पक्षाची ताकद वाढवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर- भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हल्लाबोल’ व काँग्रेसने ‘जनआक्रोश’ असे स्वतंत्र मोर्चा काढत मंगळवारी नागपुरात अाधी स्वतंत्र व मग नंतर एकत्रित शक्तीप्रदर्शन केले. मात्र, माेर्चात सर्वाधिक राष्ट्रवादीचेच झेंडे आणि शरद पवारांच्या नावे घोषणा पाहता हे अांदाेलन राष्ट्रवादीनेच हायजॅक केल्याचे दिसून अाले.  शरद पवार आता भाजपच्या धर्तीवरच कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या मदतीने भाजप वाढली तशाच पद्धतीने काँग्रेसला सोबत घेऊन विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.    


राज्यातील २८२ मतदारसंघांपैकी २५ टक्के आमदार विदर्भातील अाहेत. मात्र विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही.  ती वाढविण्याचे पवारांचे प्रयत्न अाहेत. २०१२ मध्ये काँग्रेससोबत असूनही विदर्भातील अनेक नगर परिषदांत राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने नगराध्यक्ष केले. परंतु त्याचा नंतरच्या निवडणुकांत अपेक्षित फायदा झाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विदर्भातून सर्वाधिक आमदार निवडून आणले. परंतु गेल्या तीन वर्षांत विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारवरील रोष वाढल्याने पवार यांनी अाता विदर्भाकडे लक्ष दिले आहे. पवार यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात विदर्भातील शेतकरी, कामगारांसोबत व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांशीही विदर्भातील प्रश्नावर चर्चा केली. शिवाय, विदर्भातील काँग्रेसची परंपरागत मते लक्षात घेऊन राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपवरही तोंडसुख घेतले होते.  सुप्रिया सुळे यांनीही यवतमाळमधून हल्लाबोल यात्रा सुरू केली. नागपूरमध्ये दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या यात्रा काढल्या. काँग्रेसने दीक्षाभूमी येथून, तर राष्ट्रवादीने मॉरिस कॉलेज येथून मोर्चा काढला. राष्ट्रवादीने शरद पवार यांना,  तर काँग्रेसने राहुल गांधींना आमंत्रित केले होते. गुजरात निवडणुकांचे कारण देत राहुल आले नाहीत. परंतु, पवारांसोबत एका मंचावर येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानेच राहुल गांधी आले नसल्याचीही चर्चा हाेती. काँग्रेसचा कोणी तरी मोठा नेता असावा म्हणून पूर्वी यवतमाळमधून लोकसभेवर गेलेल्या गुलाम नबी आझाद यांना आमंत्रित केले हाेते.

 

क्षणचित्रे   
-  मोर्चात २ लाख कार्यकर्त्यांचा दावा, प्रत्यक्षात २५ हजार.  
- व्यासपीठावर नेत्यांच्या प्रचंड गर्दी झाल्याने व्यासपीठ कोसळण्याची भीती आयोजकांनीच व्यक्त केली.   
- कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून घुसले, झेंड्यांमुळेे व्यासपीठ दिसत नव्हते.   
- काँग्रेसचे वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांच्या सूत्रसंचालनात काहीही ताळमेळ नव्हता.   - नेत्यांची भाषणे रटाळवाणी, प्रत्येक भाषणात कर्जमाफीच मुद्दा होता.   
- ड्रोनद्वारे डिजिटल बोर्डवर चित्रण.  
- सुप्रिया सुळे शेवटी पोहोचल्याने बसायला खुर्चीच नव्हती, तब्बल १० मिनिटे उभ्या होत्या. शेवटी त्या अजित पवार अन् सुनील तटकरे यांच्यामध्ये कशाबशा बसल्या. 

 

> काँग्रेसचे भाई जगताप, यशोमती ठाकूर, शहराध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई, अबू आझमी आदी नेत्यांचीही भाषणे झाली.    

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’च्या घोषणा आणि काय म्‍हणाले नेते...

बातम्या आणखी आहेत...