आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेलगतच्या विहिरीत शुक्रवारी संशयास्पद स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची शनिवार, १७ मार्चला ओळख पटली असून, हा मृतदेह आक्रमण संघटनेच्या महिला संघटक प्रमुख शीतल पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शीतल यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आक्रमण संघटनेचा संघटक प्रमुख अॅड. सुनील गजभियेसह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शीतल अरुणराव डुकरे (पाटील) (वय ३२) या मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. तसेच त्या आक्रमणचे अॅड. सुनील गजभिये यांच्या सहायक म्हणून काम करत होत्या. मंगळवार, १३ मार्चपासून त्या घरून बेपत्ता होत्या. शहरातील विलास नगर भागात त्या वृद्ध आई, आठ वर्षीय मुलगी परीसोबत राहत होत्या. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील अजमिरे यांच्या पडीक शेतातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पाण्यामुळे हा मृतदेह फुगला होता. त्यामुळे सुरुवातीला ओळख पटवण्यासाठी पोलिसांसह नातेवाइकांना अडचणीचे ठरले होते. मात्र शनिवारी सदर मृतदेह शीतल पाटील यांचाच असल्याचे पुढे आले. दरम्यान शीतल पाटील या नेहमी अॅड. सुनील गजभियेसोबत वावरत होत्या. त्यामुळे पोलिसांनी अॅड. गजभियेचा शोध घेतला असता, ते घरी मिळून आले नाही. तसेच त्यांचा फोनही लागत नाही.
दुसरीकडे शनिवारी दुपारी शीतल पाटील यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनाअंती वैद्यकीय सूत्रांनी मृत्यूचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला. यामध्ये शीतल यांच्या मृत्यूचे कारण डोक्याला अंतर्गत दुखापत असल्याचे पुढे आले.
याप्रकरणी शीतल यांचा भाऊ वैभव विद्यानंद बन (२४, रा. परतवाडा) यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार देऊन आक्रमण संघटनेचे प्रमुख अॅड. सुनील श्यामराव गजभिये यानेच बहिणीला मारल्याचा आरोप केला आहे. तसेच मंगळवारी दुपारी शीतल पाटील या अॅड. गजभिये व रहमत खान पठाण नामक व्यक्तीसोबत दिसल्याची माहिती बन यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे अॅड. गजभिये, पठाण व अन्य दोन ते तीन व्यक्तींचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचा बन यांनी तक्रारीत उल्लेख केल्यामुळे पोलिसांनी खून करणे तसेच पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, २४ फेब्रुवारी २०१८ ला शीतल या परतवाडा येथे वैभव बन यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वैभवला सांगितले की, अॅड. गजभियेला माझ्यासोबत लग्न करण्याबाबत म्हटले असता सुरुवातीला त्याने होकार दिला. मात्र मागील काही दिवसांपासून तो लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. इतकेच नाही तर हा प्रकार गजभियेच्या घरी माहीत झाल्यामुळे त्याचे व त्याच्या पत्नीचे वाद झाले आहे. विशेष म्हणजे गजभियेने लग्नास टाळाटाळ करण्यासोबतच तुला किंवा माझ्या पत्नीला मी संपवून टाकेल, अशी धमकीसुद्धा दिल्याचे शीतल यांनी वैभवला सांगितले होते. असा उल्लेख वैभव यांनी दिलेल्या तक्रारीत केला असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांनी अॅड. गजभिये व इतरांचा शोध सुरू केला आहे.
दुचाकीच्या नंबर प्लेट बेपत्ता
शीतल यांनी मंगळवारी इर्विन चौकात दुचाकी उभी केली होती. त्या दिवसांपासून ही दुचाकी त्याच ठिकाणी उभी होती. विशेष म्हणजे दुचाकीवरील दोन्ही नंबर प्लेट शनिवारी बेपत्ता असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे त्या नंबर प्लेट कुणी व का काढल्या, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला असून, आता पोलिसांना दुचाकीच्या नंबर प्लेट काढणाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.
आठ वर्षीय परीने दिला आधार
शीतल यांचा २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अरुण डुकरे यांच्यासोबत विवाह झाला होता. मात्र आजाराने २०१२ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे चिमुकल्या मुलीला घेऊन शीतल अमरावतीत राहणाऱ्या श्यामल नामक बहिणीकडे राहायला आल्यात. सद्या शीतल आठ वर्षीय मुलीला घेऊन आईसह राहत होत्या. शीतल यांच्या मुलीचे नाव परी आहे. परी सद्या तिसऱ्या वर्गात शिकते. शीतल यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शीतलचे नातेवाईक व मैत्रिणींना दुःख: अनावर झाले व त्यांनी प्रचंड आक्रोश केला होता. त्यावेळी परीने नातेवाईक व शीतल यांच्या मैत्रिणींना रडू नका, मी रडते का? असे म्हणून आधार दिला.
'वसुंधरा'च्या माध्यमातून अनेक महिलांना दिला आधार
शीतल पाटील या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. विविध अडचणीमध्ये असलेल्या अनेक महिलांना शीतल यांनी वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून आधार दिला आहे. इतकेच नाही तर शीतल यांच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी लहान मुलीला घेऊन सक्षमपणे स्वत:ला सावरले होते. अडचणीतील महिलांना आधार देणारी, स्वत:ला अवघड परिस्थितीत सांभाळणारी ही महिला स्वत: आत्महत्या कशी करणार अशी चर्चा या घटनेनंतर नागरिकांमध्ये दिवसभर सुरू होती.
चिठ्ठी बनावट, बहिणीचे अक्षर नाही
शीतल यांचा मृतदेह मिळून आला त्याच विहिरीतून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली.त्यामध्ये आईच्या मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करून खाली आपली नम्र व स्वाक्षरी होती. मात्र सदर चिठ्ठीवरील अक्षर माझ्या बहिणीचे नसल्याचे वैभव यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळेच पोलिस आता ही चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवणार आहे.
सर्व दिशेने तपास सुरू
शीतल पाटील यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून तसेच आमच्या प्राथमिक चौकशीत शीतल या मंगळवारी दुपारी इर्विन चौकातून अॅड. गजभियेंसोबत गेल्याची माहिती मिळाली आहे. तसेच २४ फेब्रुवारीला शीतल यांनी भावाकडे अॅड. गजभिये लग्नासाठी टाळाटाळ करत असून जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे आम्ही अॅड. गजभियेसह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सर्वच दिशेने तपास करत आहोत.'' - मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर.
शीतल विहिरी जवळ पोहोचल्या कशा?
शीतल पाटील यांची दुचाकी इर्विन चौकात उभी होती. इर्विन चौकातून सदर विहीर जवळपास पाच ते सहा किमी. अंतरावर आहे. तसेच विहिरीजवळ शीतल पाटील पोहोचण्याच्या कोणत्याही बाबी पोलिसांना आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या सहा किमी. अंतर कापून गेल्या कशा व त्यांनी आत्महत्या केली कशी, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.