आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलोशीपचे गैरप्रकारे उचललेले सहा लाख विद्यापीठाला परत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त होणारी राजीव गांधी फेलाेशीपची गैरप्रकारे उचललेली रक्कम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला परत करण्यात आली. फेलोशिपकरीता मार्गदर्शक असलेले रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद अस्वार यांना नवीन विद्यापीठ कायद्याच्या कलम ६४ अन्वये अपात्र घोषित करण्याच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघड झाला. दिव्य मराठीचे वृत्त प्रकाशित होताच तब्बल आठ वर्षांनी धमेंद्र दुपारे यांच्याकडून ६ लाख १७ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. 


दिव्य मराठीने 'वेतनवाढची शिक्षा कायम असताना डॉ. अस्वार समित्यांवर कायम' या मथळ्याखाली २ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच फेलोशिपधारक धमेंद्र दुपारे यांनी दोन टप्पांमध्ये रक्कम विद्यापीठाकडे परत केली आहे. पहिल्या टप्पात पाच लाख तर दुसऱ्या टप्पात १ लाख १७ हजार ३५० रुपये आरटीजीएसद्वारे विद्यापीठाच्या खात्यात जमा केले. शिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विकास विभागाचे कुलसचिवांनी २ मे २०१८ राेजीच्या पत्राद्वारे धमेंद्र दुपारे यांना रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा झाल्याचे देखील कळविले आहे. युजीसीकडून धर्मेंद्र दुपारे यांना पीएचडी रिसर्चकरिता राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (आरजीएनएफ) मंजूर झाली होती. विद्यापीठ रसायनशास्त्र विभागात संशोधनाकरीता धमेंद्र १५ जानेवारी २००६ रोजी रुजू झाले होते. विभागातील डॉ. आनंद अस्वार हे फेलोशिपचे मार्गदर्शक होते. 


युजीसी मार्गदर्शक तत्वानुसार सदर फेलोशिप पाच वर्षांपर्यंत किंवा पदवी अवार्ड होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सुरू राहणार होती. त्यानुसार दुपारे यांनी १८ ऑगस्ट २०१० ला डीग्री अवार्ड झाल्याने १५ जानेवारी २००६ ते १७ ऑगस्ट २०१० पर्यंत फेलोशीप घेतली. मात्र दुपारे यांनी फेलोशीप दरम्यान अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी केली तसेच विभाग प्रमुखाशी संगनमत करुन व त्यांना आर्थिक सहाय्य देऊन गैरमार्गाने फेलोशीपची रकम उचलण्याबाबत औरंगाबाद येथील संजय शिंदे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या शहानिशेनंतर दुपारे यांनी फेलोशीप दरम्यान अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव दिनेश कुमार जोशी यांनी डॉ. अस्वार यांच्यावर अध्यादेश क्रमांक १२२ चे प्रकरण सात मधील परिच्छेद ३९,४०(१) व (६) नुसार अपेक्षित वर्तणुकीचा भंग करणारी असल्याने अध्यादेशातील परिशिष्ट अ च्या परीच्छेद ६, १२(ए)(बी)(डी) व (एफ) नुसार गैरवर्तणुकीत माेडत असल्याने शिस्तभंग कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(१०) च्या तरतुदीअंतर्गत शिस्तभंग विषयक प्राधिकारणी या नात्याने कुलगुरूंनी समाधानकारक स्पष्टीकरण नसल्याने वर्तणूक शिक्षकांच्या सेवाशर्ती संदर्भातील अध्यादेशानुसार वेतनवाढ बाद करण्याची शिक्षा डॉ. ए. एस. अस्वार यांना ठोठावली होती. 


दरम्यान नवीन सार्वत्रिक महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ लागू झाला. त्यानुसार उच्च विचार, निर्दोष वर्ण असलेल्या व्यक्तींची विद्यापीठ प्राधिकारणींवर निवड करता येते. मात्र अपात्र, दंड, शिक्षा झालेल्या व्यक्ती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवडूण येऊ नये, नामित होऊ नये म्हणून नवीन कायद्यात कलम ६४ अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. मात्र डॉ. अस्वार परीक्षा, अभ्यास मंडळ, संशोधनासह विविध समित्यांवर कायम अाहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध समित्यांवरुन डॉ. आनंद अस्वार यांना अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे २४ जानेवारी २०१८ रोजी तक्रार केली होती. 

 
डॉ. अस्वार अद्याप समित्यांवर कायम 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राजीव गांधी फेलाेशीप गैरप्रकारे प्राप्त केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाने रसायनशास्त्र विभाग प्रमुख यांनी वेतनवाढ बाद केली आहे. शिवाय धमेंद्र दुपारे यांनी रक्कम परत केल्याने त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. असे असताना डॉ. आनंद अस्वार मात्र विविध समित्यांवर कायम असल्याने शैक्षणिक समित्यांवर आश्चर्य व्यक्त होत आहे. 


यामुळे झाली वेतनवाढ बाद 
डॉ. आनंद अस्वार यांचे कृत्य विभाग प्रमुख तसेच मार्गदर्शक या नात्याने अतिशय बेजबादार पणाचे असून जबाबदारी, कतर्व्यतत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येत असल्याचे कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद होते. शिवाय विभागाचा शैक्षणिक दर्जा कायम ठेवण्यासंदर्भात अनास्था तसेच विद्यापीठाची अप्रतिष्ठा होईल असे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...