आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवा, सांडपाणी गुणवत्तेवरून शहरांत लागणार स्टार रेटिंगची स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वायू प्रदूषणाच्या प्रमाणावर उद्योगांना स्टार रेटिंग सुरू करण्यात आल्यावर आता राज्यातील शहरांनाही हवा आणि सांडपाण्याच्या गुणवत्तेवरून १ ते ५ या दरम्यानचे स्टार रेटिंग दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या सहा शहरांपासून रेटिंगची सुरुवात होणार असून दुसऱ्या टप्प्यात सर्व प्रमुख शहरांचा या प्रक्रियेत समावेश केला जाणार आहे.   


राज्यातील उद्योग आणि सर्वसामान्य लोकांमध्येही वायुप्रदूषणाबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी तसेच उद्योगांमध्ये प्रदूषण किमान पातळीवर आणण्यासाठी स्पर्धा लागावी, या हेतूने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात स्टार रेटिंग कार्यक्रम सुरू केला आहे. असे रेटिंग देऊन प्रदूषण निर्मूलनाच्या दिशेने पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.


आता त्यापुढे जाऊन शहरांना प्रदूषणाच्या स्थितीबाबतचे स्टार रेटिंग देण्याची प्रक्रिया येत्या काही महिन्यांत सुरू होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनगलबन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


या प्रक्रियेसाठी शहरातील हवेचे आणि सांडपाण्याचे गुणवत्तेचे मापदंड निश्चित केले जाणार आहेत. हवा आणि सांडपाण्याच्या दोन्ही निकषांवर शहरांमधून हवेची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सांडपाण्याचे नमुने गोळा करून प्रदूषणाची स्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानुसारच शहरांना एक ते पाच या दरम्यानचे स्टार रेटिंग प्रदान केले जाईल, अशी माहिती डॉ. अनगलबन यांनी दिली.  

 

काही महिन्यांत ५७ ठिकाणी यंत्रणा  
सर्व शहरांत हवा निरीक्षण प्रणाली उभारण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. सध्या राज्यात सुमारे १०० हवा निरीक्षण प्रणाली उभारणे शक्य असून काही महिन्यात आणखी ५७ ठिकाणांवर अशा प्रणाली उभारल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमुळे शहरांमध्येही प्रदूषणाबाबत जाणीव जागृतीसह स्पर्धा निर्माण होऊ शकेल. शहरांमध्ये सांडपाण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक यंत्रणांना यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल, असे अनगलबन यांनी सांगितले.

 

पहिल्या टप्प्यात विभागीय मुख्यालये
अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता मोजणारी हवा निरीक्षण प्रणाली (एअर मॉनिटरिंग सिस्टिम) उपलब्ध नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई अशी विभागीय मुख्यालये असलेल्या सहा शहरांपासून स्टार रेटिंगची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात सर्व मोठ्या शहरांचा या प्रक्रियेत समावेश केला जाणार असल्याचे डॉ. अनगलबन यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...