आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी विद्यापीठाने दाखवला चक्क 'गैरहजर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वर्षभर अभ्यास करून बीएससीच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गैरहजर दाखवून नापास ठरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेवटी ज्या परीक्षा केंद्रात त्याने परीक्षा दिली, तेथील प्राचार्यांचे पत्र व त्याच्या महाविद्यालयाचे पत्र सादर केल्यावर त्याला तात्पुरती गुणपत्रिका मिळाली. 


निखिल दिलीपराव कुबडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतरही त्याला परीक्षेत गैरहजर दाखवून नापास ठरवले. परीक्षेला आपली उपस्थिती दाखवण्यासाठी या असंवेदनशील यंत्रणेने निखिलचे तब्ब्ल आठ दिवस पीठ पाडून प्रचंड मनस्ताप दिला. 


अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या निखीलने एप्रिल २०१८ मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी आणि केमिस्ट्री या विषयांचे पेपर दिले. अकोला येथील सीताबाई आर्ट कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज हे केंद्र होते. १८ जून २०१८ ला बीएससी अंतिम वर्षांचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आणि निखिलला जबर धक्का दिला. तिन्ही पेपर देऊन त्याला बायोटेक्नॉलॉजी विषयात चक्क गैरहजर दाखवून त्याला नापास असल्याचा निकाल दिला. वास्तविकता पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल इतर निकालांच्या तुलनेत लवकर जाहीर होणे अपेक्षित आहे. कारण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अमरावती विद्यापीठ वगळता दुसऱ्या विद्यापीठातही जावे लागते. अशा वेळी नियमित निकालच जून महिना अर्धा उलटल्यावर लावला होता. अशा निकालामुळे पुढील शिक्षणासाठी इतरत्र विद्यापीठात करावी लागणारी प्रक्रियाही तो करू शकत नव्हता. त्याच्यासोबत शिकणारे मित्र पुढील प्रवेशासाठी अर्ज भरत होते आणि केवळ विद्यापीठाने केलेल्या गोंधळामुळे निखिल मात्र आपण परिक्षा दिली, हे विद्यापीठाला पटवून देण्यासाठी कागदपत्रे गोळा करत होता. 


वास्तविक पाहता त्याने परीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र ज्या परिक्षा केंद्रावरून त्याने परीक्षा दिली, त्यांनीही दिले. तो ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता, त्यांनीही त्याच्या उपस्थितीचे पत्र विद्यापीठाला दिले होते. हे सगळ सुरू असतानाही दुसरीकडे मात्र त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीची चिंता सातत्याने भेडसावत होती. कारण वसतीगृहाचे अर्ज, एमएससी किंवा अन्य पुढील शिक्षणासाठी करावयाच्या अर्जप्रक्रिया सुरू झाल्या होत्या. 


या प्रकरणात विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांना भेटून निखिलने झालेला घोळ लक्षात आणून दिला. आपल्या उपस्थितीचे पुरावे त्याने सादर केले. त्याची पुढील वाटचाल थांबू नये, डॉ. जयपूरकर यांनीही परीक्षा विभाग व गोपनीय विभागांना तातडीने सदर प्रकरण मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यात. मात्र तरीही या दोन्ही विभागाने निखीलची तात्पुरती गुणपत्रिका बनवण्यासाठी चार दिवसांचा अवधी घेतला. यातही परीक्षा विभागाने अगदी तातडीने हे काम केले मात्र परीक्षेत किती गुण आहे, ही माहीती परीक्षा विभागाला गोपनीय विभागाकडून घ्यावी लागली. त्यासाठी तीन दिवसांचा वेळ खर्ची गेला. मात्र सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा तसेच प्र - कुलगुरूंनी स्वत: लक्ष घातल्यामुळे निखिलला सोमवारी सांयकाळी (दि. २५) तात्पुरती गुणपत्रिका देण्यात आली. 


प्रचंड मनस्ताप झाला 
परीक्षा देऊनही विद्यापीठाने माझा निकाल नापास दिला, तसेच मला गैरहजर दाखवले. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी आठ दिवस अर्ज करता आले नाही, किंवा वसतीगृहासाठीही अर्ज करू शकलो नाही. या प्रकारामुळे मागील आठ दिवस मला प्रचंड मानसिक झाला. 
- निखिल कुबडे, विद्यार्थी. 


चौकशी करणार 
परीक्षा देवूनही विद्यार्थ्याला गैरहजर दाखवले, तसेच निकाल नापास दिल्याचा हा प्रकार गंभीर आहे. कोणाची चूक आहे, याबाबत आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. असा प्रकार पुन्हा होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. 
- राजेश जयपूरकर, प्र- कुलगुरू 

बातम्या आणखी आहेत...