आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील 10 हजारांवर रिक्त पदे भरतीसाठी कलेक्टोरेटवर धडकले 4 हजार बेरोजगार तरुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, कला, वाणिज्य, साहित्य शाखेतून उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगारीच्या दाहक ज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील सुमारे चार हजार बेरोजगार अन् स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची वज्रमूठ शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी एकवटली अन् युवा बेरोजगारांचा हा एल्गार दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अभियंते, फौजदार, तहसीलदार, शिक्षक, तलाठ्यांची जिल्ह्यातील १० हजारांवर असलेली पदे भरण्यासोबतच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करा, बेरोजगारीचा अनुशेष भरून काढा, अशा गगनभेदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला.

 

बैठक सोडून जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांना सामोरे गेले : या मोर्चाद्वारे जिल्हा व शहरातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती मोठी असून हा प्रश्न शासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस आणखीच गंभीर होत असल्याचे चित्र पुढे आले. मोर्चा आयोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार अन्य कोणालाही देणार नाही, असा अट्टहास बाळगल्यामुळे अखेर विभागीय आयुक्त कार्यालयात असलेले जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना बैठक सोडून परत येत त्यांचे निवेदन स्वीकारावे लागले. सोबतच जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या पदांची भरती करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. उर्वरित पदांसाठी आपण शासनाकडे तुमचे निवेदन सोपवू असे, आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिले. हाती विविध घोषणांचे फलक असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संयुक्त परीक्षेचे वारे बंद करा, पूर्वीचे धोरण लागू करा, आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे आयोगाने संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे, पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओ परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, अशा मागण्या केल्या. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गेल्या काही वर्षांपासून शासकीय नोकऱ्यांसंदर्भात व एकूणच रोजगाराच्या धोरणाबाबत उदासीनता ठेवत रोजगार कपातीचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची निराशा झाली आहे.


स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हा एकमेव पर्याय आमच्यापुढे आहे. मात्र शासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून आपल्या संकेत स्थळावर शासनाकडून मागणी पत्रक प्राप्त झाले नाही,असे लिहून जबाबदारी झटकली जात आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे. सारंग जवरखेडे, अक्षय नरगडे, सुशांत पोरे, सिद्धार्थ तायडे, चंदन तिडके, हर्षद धांडे, रोहिणी कोणटके यांच्या नेतृत्वात चार हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले.

 

बेरोजगार विद्यार्थ्यांच्या मागण्या : राज्य सेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करा, १ लाख ७० हजार रिक्त पदे तातडीने भरा, तसेच केंद्र सरकारच्या ४ लाख २० हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भराव्या, परीक्षेसाठी प्रवेश फी ही जीएसटी वगळून माफक असावी. सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना समान परीक्षा शुल्क असावे, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई कनिष्ठ अभियंता स्थापत्य सरळ सेवा भरती, २०१७ ची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, पोलिस भरतीच्या पद संख्येत वाढ करा, सरकारी नोकऱ्यांमधील पदांच्या कपातीचे धोरण रद्द करा, अभियोग्यता चाचणीनुसार पात्र शिक्षक उमेदवारांची त्वरित भरती करा, जि. प., जलसंपदा, जलसंधारण, समाज कल्याण, कृषी विभाग, महिला व बालविकास, महसूलच्या रिक्त जागा भरा, खासगी तत्त्वावर पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरा, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावा, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी रोजगाराच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

 

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय रोखण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर बेरोजगार युवक, युवतींनी जिल्हाधिकारी बांगर यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी हात जोडून त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

 

पदे रिक्त असूनही भरली जात नाही
जिल्ह्यासह राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सुमारे १ लाख ५० हजार पदे रिक्त असूनही गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती भरण्यातच आली नाहीत. शासन घोषणा करताना पदभरतीची जी संख्या देते प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा निम्म्या जागाही काढल्या जात नाहीत. हजारो विद्यार्थी तलाठी, पोलिस भरती परीक्षेची तयारी करत असतात. मात्र अपेक्षेनुसार पदे काढली जात नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांनी दिली.

 

विद्यार्थ्यांनुसार रिक्त असलेली पदे
पोलिस, शिक्षक, तलाठी, अभियांत्रिकी तसेच अन्य विभागात जिल्ह्यात १० हजारावर पदे रिक्त आहेत. शिक्षक भरतीत ४०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु, त्यांना नियुक्ती मिळाली नाही. दोन ते तीन वेळा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात ५ ते ७ हजार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २ हजार विद्यार्थी असे आहेत ज्यांना यंदा अंतिम संधी असून त्यांनी जर परीक्षा दिली नाही, तर ते पुढील परीक्षा देण्यास पात्र ठरणार नाहीत. अभियांत्रिकीचे ३ ते ३ हजार ५०० विद्यार्थी सद्यस्थितीत बेरोजगार आहेत, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...