आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एेन उन्हाळ्यात वीज केंद्रांना भासतेय काेळशाची कमतरता; महानिर्मितीची न्यायालयात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाची कमतरता भासत असून कोळशाच्या साठ्यात ४३ टक्के तूट निर्माण झाल्याची माहिती महानिर्मितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या आपल्या शपथपत्रात दिली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेच्या मागणीत वाढ होणार असताना कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्याला पुन्हा एकदा भारनियमनाचा सामना करावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  


महानिर्मितीला १ लाख १९ हजार टन कोळशाची गरज असताना पुरवठा मात्र ९५ हजार ७७३ टनाचाच होत आहे. रोजच्या पुरवठ्यातील ही तूट मोठी असल्याचे महानिर्मितीने शपथपत्रात म्हटले आहे. नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर महानिर्मितीने उच्च न्यायालयात हे शपथपत्र दाखल केले आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्स आणि महानिर्मितीमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे ग्राहक भरडले जात असल्याचा वडपल्लीवार यांचा आरोप आहे. देशांतर्गत कोळशाचा अपुरा पुरवठा व त्यामुळे कोळशाची आयात करावी लागत असल्याने वीजनिर्मिती महागडी होत असून त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा वडपल्लीवार यांचा दावा आहे.   


केंद्रीय वीज प्राधिकरणाने देखील यापूर्वीच वीज केंद्रांना कोळशाचा तुटवडा भासू नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. महानिर्मितीला कुठल्याही परिस्थितीत २२ दिवसांचा कोळशाचा साठा ठेवावा लागतो, याकडे महानिर्मितीने न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

बातम्या आणखी आहेत...