आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश धस- धनंजय मुंडे चकमकीने विधान परिषद तापली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी व्यत्यय आणूनही आक्रमकपणे त्यांना उत्तर देणारे भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस आणि त्यांना साथ देणाऱ्या मंत्री व भाजप सदस्यांमुळे गुरुवारी विधान परिषदेतले वातावरण तापले होते. बोलू न देण्याचे ‘राष्ट्रवादी’चे डावपेच उधळवून लावत धस यांनी टोमणे मारत टिच्चून भाषण पूर्ण केले. बुधवारीही राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित व धस यांच्यात खडाजंगी झाली हाेती.  


मुंडे- धस यांच्यातील वादाला स्थानिक राजकारणाची झालर अाहे. राष्ट्रवादीचा राजीनामा देत मुंडेंच्या नाकावर टिच्चून सुरेश धस नुकतेच उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघातून भाजपतर्फे विजयी झाले. हा विजय ‘राष्ट्रवादी’च्या जिव्हारी लागला असल्याचे पडसाद विधान परिषदेच्या कामकाजात उमटत आहेत. धस यांना लक्ष्य करण्याची संधी ‘राष्ट्रवादी’ सोडत नसल्याचे दिसत आहे.   

 

राईनपाड्यातील पाच भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेवर बोलण्यासाठी धस उभे होते. या वेळी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “कालपासून मी सगळ्यांची भाषणे ऐकतो आहे. जणू काही भाजप, हिंदुत्ववादी, संघामुळेच सगळे घडले असा मथितार्थ सगळ्यांच्या बोलण्यातून लक्षात येतो. मात्र, संघाच्याच नानाजी देशमुखांनी आयुष्यभर आदिवासींसाठी काम केले.’ सोशल मीडियातून परसवणाऱ्या अफवांबद्दल धस म्हणाले, ‘देवा गायकवाड, रवी बांगर, मुंडे या ‘राष्ट्रवादी’शी संबंधित लोकांना अटक झाली. त्यांनी सोशल मीडियातून मुख्यमंत्री, पंकजा मुंडे आदींबद्दल गलिच्छ लिहिले. 

 

‘कोरेगाव भीमा’च्या घटनेनंतर सोशल मीडियातून विखारी प्रचार केला.’ यास राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी हरकत घेतली. धनंजय मुंडेही उभे राहिले. तेव्हा धस यांनी तुम्ही बोलत असताना मी शांतपणे एेकून घेतले, असे सुनावले. मात्र, धस विषय सोडून बोलत असल्याचा आक्षेप मुंडंेनी घेतला. सोशल मीडियातल्या ट्रोलिंगबद्दल आम्ही बोलायला लागलो तर मिरच्या झोंबतील, असे मुंडे म्हणाले. तेव्हा भाजपचे भाई गिरकर धस यांच्या मदतीला धावले. गिरकर म्हणाले, ‘राईनपाडाचा विषय असताना तुमच्या विद्या चव्हाण बाबरी मशीद, अखलाख वगैरे देशभर ‘फिरून’ आल्या. आम्ही तुमच्या प्रत्येक शब्दाला आक्षेप घेतला नाही. तुम्हीही आता ऐकून घेतले पाहिजे.’ मंत्री गिरीश बापट यांनीही प्रत्येक जण संदर्भ देत बोलत असल्याने आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे बजावले. सभापती माणिकराव ठाकरे यांनीही धस यांना बोलणे पूर्ण करण्यास सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...