आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेत खडाजंगी : सांसदीय कार्यमंत्र्यांना न जुमानता 'धस'गिरी, सभापतींकडून समज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील कोणताही विषय असला तरी बीड जिल्हा बँकेचा विषय काढून राष्ट्रवादीला लक्ष्य करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरूवारी सभापतींचा निर्वाणीचा इशारा व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापटांनी केलेल्या कळकळीच्या विनंतीलाही न जुमानता अत्यंत असंसदीय शब्दांत 'धस'कटगिरी सुरूच ठेवली होती. अखेरीस बापट, खोत या मंत्र्यांनी व भाई गिरकर, विनायक मेटेंसह तीन आमदारांना धस यांना धरुन जागेवर बसवावे लागले. संसदीय सभागृहात न शाेभणारा हा प्रकार गुरुवारी विधान परिषदेत पाहायला मिळाला. 


पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू असताना, शेती व पीककर्जाच्या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सरकारला धारेवर धरत हाेते. राष्ट्रवादीतून भाजपत येऊन अामदार झालेले सुरेश धस हे त्याच वेळी मुंडेंना अाक्रमक प्रत्त्युत्तर देत राहिले. यूपीए सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा उल्लेख करीत धसांनी राष्ट्रवादीचे अामदार अमरसिंह पंडित यांचे नाव घेत वैयक्तिक आरोप केले. त्यास मुंडेंनी आक्षेप घेतला. 


पंडित यांच्या विधान परिषदेच्या कार्यकाळ संपला अाहे. एखाद्या सदस्याला निरोप दिल्यानंतर व ते सभागृहात नसताना त्यांचे नाव घेऊन आरोप करता येत नाही हे मुंडे यांनी लक्षात आणून दिले. त्यासाठी नियम ३५ ची नोटीस द्यावी लागते. सभापतींनी नियम ३५ ची नोटीस स्वीकारलेली नसताना धस हे पंडित यांचे नाव घेऊन कसे बोलत आहेत, असा सवाल मुंडे यांनी केला. धस यांनी नियमांचे पालन केले आहे काय, ज्याच्याविरुद्ध बोलायचे आहे त्या सदस्यालाही ती नोटीस द्यावी लागते, तशी ती दिली आहे काय, असा सवाल मुंडे यांनी केला. 


त्यावर धस म्हणाले, 'नियम ३५ ची माझी सूचना नाकारण्यात आली नाही. धनंजय मुंडे खासगीत माझ्याविरुद्ध ५०० फाइल्स असल्याचे बोलले. त्यांनी ५०० नाही ५ हजार फाइल्स आणाव्यात. आपण कुठेही फसलेलो नाही,' असे धस म्हणाले. त्यावर किरण पावसकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. वैयक्तिक पातळीवर टीका करण्यासाठी हे सभागृह नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक सदस्य फक्त सदनातील दोन सदस्यांच्या विरोधात बोलण्यासाठी आणला, असा भाजपवर आरोप केला. न्यायालयातील प्रकरणे देऊन वैयक्तिक का करता? हिंमत असेल तर अंतिम आठवडा प्रस्तावाचे उत्तर द्या, असे आवाहन मुंडे यांनी केले. तहकुबीनंतर सभागृह सुरू झाल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नियम ३५ ची नोटीस नाकारण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत नियम २६० च्या प्रस्तावावर बोलण्याची सूचना धस यांना केली. तसेच वैयक्तिक अाराेप न करण्याची सूचना धस यांना केली. 


लाेकप्रियतेसाठी धस यांची सवंग वक्तव्ये : पाटील 
मुंडेंच्या प्रत्येक अाराेपाला अामदार धस तितक्यात त्वेषाने उत्तर देत हाेते. काही वेळ तर या दाेघांतच खडाजंगी अनुभवायला मिळाली. जणू संपूर्ण सदनच त्यांनी वेठीस धरले हाेते. त्याबद्दल शेकापचे जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 'लोकप्रियतेच्या हव्यासापोटी धस यांनी सिनेमातील गाणी व डायलॉगच्या आधारे खुमासदार मांडणीच्या नादात, बोलण्यात सवंगता आणली', असा अाराेपही केला. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनीही त्यांच्या वक्तव्यावर अाक्षेप घेत धस यांना समज दिली. त्यानंतर भाजपच्या आमदारांना धस यांना सभागृहाबाहेर घेऊन जावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...