आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समभाव निर्मितीसाठी शिक्षक स्वखर्चातून देताहेत जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, लेखन साहित्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वर्गात समान भाव निर्माण व्हावा म्हणून एक नव्हे तर तब्बल दोन तपापासून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाकडून स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दप्तरासह लेखन साहित्य दिले जात आहे. भातकुली तालुक्याच्या शिवणी खुर्द येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापकपदावर कार्यरत असलेले राजेश सावरकर असे विद्यार्थ्यांमध्ये समान भाव निर्माण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. 


पुस्तके तर काही विद्यार्थ्यांना गणवेश शासनाकडून दिला जातो. मात्र गावखेड्यात अनेकांकडे शैक्षणिक साहित्य घेण्यापुरते देखील पैसे नसतात. विपरीत परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून दप्तर, पाटी, लेखन, कंपास, स्केल पट्टी, पेन्सील, थ्रीइन वन बुक आदी साहित्य सावरकर यांच्याकडून शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना दिले जाते. शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना सावरकर हे स्वखर्चाने लेखन साहित्य देतात. सधन घरातील मुले-मुली त्यांच्या निवडीनुसार दप्तर, कंपास, स्केल पट्टी आदी विविध शैक्षणिक साहित्य खरेदी करु शकतात. मात्र मोलमजुरी करणाऱ्या कुंटुंबातील मुला-मुलींना हे शैक्षणिक साहित्य देखील मिळत नाही. प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांच्या मनामध्ये भेदभाव निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. 

नेमकी हीच बाब हेरुन शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेता यावे म्हणून राजेश सावरकर यांच्याकडून गत २४ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. अनुसूचित जाती, जमाती, एनटी, व्हीजे, बीपीएल आणि सर्व मुलींना शासनाकडून गणवेश दिला जाताे. मात्र या व्यतिरिक्त देखील आर्थिक परिस्थिती विपरीत असताना देखील काही विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशापासून वंचित राहतात. अश्या त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सावरकर स्वखर्चाने गणवेश देतात. 


जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर १९९४ मध्ये राजेश सावरकर यांनी धारणी तालुक्यातील चित्री येथील शाळेतून ज्ञानदानासह शालेय साहित्य वाटपास सुरूवात केली. त्यावेळी शाळेची पटसंख्या २५ ते ३० असताना देखील केवळ १० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत होते. सावरकर यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या काळात चित्री येथील शाळा शंभर टक्के पटावर आणली. १९९५ मध्ये या शाळेची पाहणी युनीसेफच्या पथकाकडून करण्यात आली होती. आनंददायी शिक्षणातून मेळघाटातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक धारेत आणल्याने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. १९९७ पासून त्यांनी अमरावती तालुक्यातील वनारसी येथील शाळेत सेवा देत असताना देखील त्यांनी १७ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवला. गत सहा वर्षांपासून सावरकर हे शिवणी खुर्द जिल्हा परिषदेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सेवा देत आहे. ज्ञानदानासह शालेय साहित्याचे वितरणाचे सावरकर यांचे दोन तप शिवणी शाळेत झाले. 


३३० लोकसंख्येच्या गावी डिजिटल स्कूल 
शिवणी या गावाची लोकसंख्या ३३० असून पटसंख्या १८ आहे. १ ते ४ पर्यंत वर्ग असून ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे. ग्रामपंचायतकडून एलसीडी स्क्रीन प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांनी स्वखर्चातून उर्वरीत साहित्य खरेदी करीत डिजिटल स्कूल संकल्पना साकार केली. परसबाग, मध्यान्ह भोजनाचे स्वतंत्र किचन, सुंदर असा परिसर या शाळेचा आहे. 

बातम्या आणखी आहेत...