आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या 11 निवृत्त सदस्यांना सभागृहातून निरोप, विरोधी पक्षनेते गहिवरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राजकीय कारकीर्दीचा प्रदीर्घ अनुभव, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी, सभागृहाचा दांडगा अनुभव या गुणवैशिष्ट्यांचे भांडार असलेल्या विधान परिषदेच्या ११ ज्येष्ठ सदस्यांना त्यांच्या निवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. त्याच वेळी पुन्हा निवडून आलेल्या पाच सदस्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या निरोप समारंभात आपल्या भावना मांडल्या.

 

मुख्यमंत्री कुणाबद्दल काय म्हणाले
- माणिकराव ठाकरे : ज्येष्ठ काँग्रेस नेते, १९८५ पासून पंचायत समिती ते मंत्रिमंडळ ते उपसभापती पदापर्यंतचा प्रवास, विधिमंडळाचा प्रदीर्घ अनुभव, अत्यंत शांत स्वभाव, नेटाने मुद्दा लावून धरण्याचे कौशल्य, विदर्भाच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेणारे नेते असलेल्या माणिकरावांनी या सभागृहातील अडचणीच्या अनेक प्रसंगांमध्ये उत्तम साथ दिली.
- अॅड. जयदेव गायकवाड : १९७२ ते ८२ दलित पँथरच्या माध्यमातून सुरू केलेली लढाई, आंबेडकरी चळवळीत योगदान, अभ्यासपूर्ण मांडणी, समकालीन विश्लेषण व वंचितांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे सदस्य म्हणून सभागृह कायमच आपले स्मरण करेल.
- सुनील तटकरे : १९९२ पासून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते राज्याचे अर्थमंत्री, नियोजन मंत्री अशी अनुभवसंपन्न कारकीर्द असलेल्या तटकरेंच्या धोरणी आणि नियोजनबद्ध कामकाजाची सदनाला कमतरता भासेल. चांगला वक्ता, हातात कागद न घेता प्रभावी मांडणी करण्याचे कौशल्य कायम आमच्या स्मरणात राहील.
- संजय दत्त : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणारे संजय दत्त यांची आम्हाला सर्वात जास्त उणीव जाणवेल. त्यांनी कायमच सभागृहात वेगळा ठसा उमटवला. सभागृहातील कामगिरीबद्दल ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांच्या आवडीच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे काम करण्याची संधी त्यांना मिळो, ही आशा.
- नरेंद्र पाटील : हळव्या मनाचे नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडले. मला माथाडी चळवळ समजावून सांगितली. राजकीय परिणामांचा विचार न करता प्रश्न आणि चळवळ यांच्यासोबत बांधिलकी मानणाऱ्या पाटलांंची निश्चितच उणीव भासेल.
- अमरसिंह पंडित : बीड जि.प सदस्य ते विधिमंडळ अशी झेप घेणारे अमरसिंह हे धडाडीचे कार्यकर्ते व नेते. साखर कारखाना, संस्थांच्या माध्यमातून त्यांची महत्त्वाची कामगिरी केली. माइकशिवाय बोलणारे व एकटे असले तरी सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची ताकद असलेल्या अमरसिंह यांची आम्हाला खूप उणीव जाणवेल.

 

बातम्या आणखी आहेत...