आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी, बोंडअळीवरून विधिमंडळात ‘हल्लाबोल’; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांच्या न्यायालयामार्फत नोटिसा येऊ लागल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पिंप्रीबुटी गावातील ज्या शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला त्या शेतकऱ्यालाही कर्जमाफी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री कर्जमाफी झाली म्हणून  जाहीर करतात ते कोट्यवधी रुपये कोणाच्या खात्यात गेले,’ असा सवाल करीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत नौटंकी करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी साेमवारी विधान परिषदेत केली.  


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  परिषदेचे कामकाज सूरू होताच धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी, बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, हमीभाव, सक्तीने होणारी वीज बिलाची वसुली, ओखी वादळामुळे झालेले नुकसान, खरेदी केंद्र सुरू नसणे आदी मुद्दयांसंबंधी स्थगन प्रस्ताव उपस्थित केला.  दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. स्वत:ला गतिमान म्हणवून घेणाऱ्या सरकारला सहा महिन्यांत कर्जमाफीची अंमलबजावणी करता आली नाही. कर्जमाफीनंतर १५०० शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला.   


मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील शेतकरी ज्ञानेश्वर राठोड यांना कर्जवसुलीसाठी बँकेने कोर्टामार्फत पाठवलेली नोटीस मुंडे यांनी वाचून दाखवली. पंतप्रधानांनी ‘चाय पे चर्चा’ केलेल्या दाभाडी गावातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप करीत  मुख्यमंत्र्यांचे  शेतकऱ्यांबाबतीतील प्रेम बेगडी असल्याचा आरोप केला. मुंडे बोलत असताना सत्ताधारी बाकावरून त्याला आक्षेप घेण्यात आला. चर्चा करण्यास सांगितले असताना मुंडे प्रस्तावाचे भाषण करीत असल्याचा आरोप सत्ताधारी बाकावरून झाला. त्यावरून विरोधकांनी विषय महत्त्वाचा असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांविरुद्ध नारेबाजी सुरू केली त्या वेळी सभापतींनी १२.४४ वाजता दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.    


तहकुबीनंतर कामकाज सुरू हाेताच मुंडेंनी पुन्हा ‘कापसाला एकरी २५ हजार रुपये मदत करणार आहे का,’ असा सवाल केला. कृषी संजीवनी योजनेत वीज बिल माफ होण्याऐवजी शंभर टक्के वसुली होत आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेताच सर्व कामकाज थांबवून स्थगनवर चर्चा घ्यावी, अशी मागणीही केली. त्यानंतर सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीची आकडेवारी सांगण्यास सुरुवात करताच मुंडे यांच्यासह विरोधी पक्ष सदस्यांनी त्याला आक्षेप घेत आवाज वाढवला. त्यावर सभापतींनी १.१० वाजता १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. तहकुबीनंतर १.२५ वाजता कामकाज परत सुरू झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले. मुख्यमंत्री कर्जमाफीचे आकडे सांगत असताना विरोधकांनी त्याला आक्षेप घेत चर्चेच्या वेळी उत्तर द्या, असे सांगितले. त्या वेळी मुख्यमंत्र्यानी चर्चेच्या वेळीच उत्तर देऊ, परंतु विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकारकडून उत्तर दिले नाही तर चर्चा एकतर्फी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सभापतींनी भाई जगताप यांना बोलायला परवानगी दिली. २८९ प्रस्ताव नाकारल्यावरही जगताप यांनी प्रस्ताव कसा होतो हे सांगायचा प्रयत्न केला. त्यावर त्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.  

बातम्या आणखी आहेत...