आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण मंत्र्यांचे अजब उत्तर, म्हणाले- बाहेरच्या विद्यार्थ्यांनी पुण्याचे प्रदूषण वाढवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हे विद्यार्थी सर्रासपणे वाहने वापरतात. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे, असे अजब उत्तर पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना पोटे म्हणाले, 'पुण्यात एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरची मुले शिक्षणासाठी का जातात? काय आहे त्या पुण्यात? हे विद्यार्थी नागपुरात, अमरावतीत का बरे शिकायला येत नाहीत', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 


त्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोटे यांना 'तुम्ही मंत्रिमहोदय आहात, प्रश्न विचारू नका, उत्तर द्या', असे सुनावले. त्यानंतर पोटे म्हणाले, 'पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी वीज आणि सीएनजी इंधनाच्या गाड्या वापरल्या पाहिजेत, तसेच पुणेकरांनी बसने प्रवास करायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले म्हणाले, प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे सरकारचे काम असते. पुणे महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे, त्याविषयी बोला, असे पोटे यांना सुनावले. 


पालिकेने बनवला कृती आराखडा : पर्यावरण मंंत्री 
पोटे यांच्या उत्तरावर सभागृहात हशा पिकत होता. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढे येऊन विरोधकांच्या फैरींना तोंड देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, 'पुण्यात कचरा, हवा व ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे. महापालिकेने प्रदूषण नियंत्रणाला आळा घालण्यासाठी २७ उपायांचा कृती आराखडा बनवला आहे.' त्यावर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी, आपण पुण्यातील लोकप्रतिनिधी असून पालिकेने असा आराखडा बनवल्याची आपल्याला काहीच कशी माहिती नाही, अशी विचारणा गाडगीळ यांना केली. त्यावर कदम यांनी 'तुम्हाला २४ तासांत तो आराखडा उपलब्ध करून देतो' असे आश्वासन दिले. एकूण, पुणे शहरातील प्रदूषणाच्या चर्चेतून ठोस अशी उपाययोजना सरकारने काही सांगितली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...