आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूगर्भातील बेसुमार पाणी उपशाला नियमांचा लवकरच बांध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भूगर्भातील बेसुमार पाणी उपशाला लवकरच नव्या नियमांचा बांध घालण्यात येणार आहे. या संबंधीचे नवे नियम तयार करण्यात आले असून मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीची मोहोर उमटल्यावर ते राज्यभरात लागू करण्यात येणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 


राज्यातील अनेक गावांमध्ये विंधन विहिरींची खोली ३०० ते ४०० फुटांपर्यंत आहे. या खोल विंधन विहिरींमधून भूगर्भातून बेसुमार पाण्याचा उपसा केला जातो. परिणामी अपवाद वगळता राज्याच्या बहुतांश भागात तीव्र पाणी टंचाई असते. याचा परिणाम सरकार विरोधी रोषातही होतो. हे लक्षात घेता नवे नियम तयार करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. वारेमाप उपशामुळे भूजलपातळीत घट होत आहे. राज्यभर कमी-अधिक प्रमाणात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहे. िवदर्भातील यवतमाळ शहरात आतापासूनच महिन्यातून २२ ते २३ दिवसातून एकदा नळ येत असून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यवतमाळात पाणी कॅनने विकत घ्यावे लागत आहे.

 

भूजल पुनर्भरणही करावे लागणार 
यापुढे नागरिकांना केवळ पाणी उपसा करता येणार नाही तर भू-जलाचे पुनर्भरणही करावे लागणार अाहे. लोकसहभागातून पाणी उपशावर मर्यादा आणण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या संबंधीची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते. 

 

३१ मार्चपर्यंत सूचना मागवल्या

भूगर्भातील बेसुमार पाणी उपशामुळे राज्यातील भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळेच बऱ्याच गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. म्हणून आता ६० मीटरपेक्षा म्हणजेच २०० फुटांपेक्षा अधिक विंधन विहीर खोदण्यास निर्बंध आणण्याचा गांभीर्याने विचार सुरू असून नव्या नियमात याचाही समावेश राहाणार असण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य भूजल प्राधिकरणाने अधिसूचीतील गावांकडून येत्या ३१ मार्चपर्यंत सूचना आणि अभिप्राय मागविल्या आहे. यात दिलेल्या सुचनेनुसार भूजलपातळी आणि उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी ६० मिटरपेक्षा जास्त खोल विंधन विहिरी खोदण्यास प्रतिबंध करावा असे नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...