आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर: कार-दुचाकीच्या अपघातात पती, पत्नीसह तीन जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती व पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील इतर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी नागपूर- सावनेर मार्गावर पाटणसावंगीजवळ घडली.  


मृतांत धनराज रघुनाथ विश्वकर्मा (५०) व सुनीता धनराज विश्वकर्मा (४५, रिंग रोड वाघोडा, नागपूर) व कार चालक राजेश जमुनादास तिवारी (४०, होशंगाबाद, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेले किशोर रामदास इंगळे व यास्मिन शेख यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नातेवाइकाकडे लग्नकार्य असल्याने धनराज व त्यांच्या पत्नी सुनीता हे सावनेर येथे आले होते. लग्न सोहळा आटोपून ते परत नागपूर येथे जाण्यासाठी निघाले होते. पाटणसावंगी शिवारात भरधाव वेगात असलेल्या कारचा चालक राजेश याने ओव्हरटेकचा प्रयत्न केला. यात दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. यात दुचाकी दूरपर्यंत फरपटत गेली. तसेच कार चालक राजेशचे नियंत्रण सुटल्याने कारही उलटली.

 

यात दुचाकीवरील धनराज व सुनीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक राजेश गाडीच्या काचांतून बाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  


अपघातानंतर या मार्गाने जात असलेले नागरिक मदतीसाठी धावले. कारमध्ये फसलेल्या व गंभीर जखमी झालेल्या किशोर व यास्मिन यांना बाहेर काढले. गंभीर जखमी असलेल्या किशोर व यास्मिन यांच्यावर नागपुरातील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी मृत कारचालक राजेश तिवारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...