आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा-गोंदियातील 49 केंद्रांवर आज फेरमतदान; पालघरमध्येही झाल्या होत्या तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी पार पडलेली पोटनिवडणूक ईव्हीएम आणि व्हीव्हीपट यंत्रांमधील बिघाडांनी गाजल्यावर या मतदारसंघातील ४९ केंद्रांवर बुधवारी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी राहिलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या सीईअो कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोटनिवडणूक झाली. या काळात मतदानादरम्यान असंख्य केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाडाच्या घटना घडल्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया खंडित झाली होती. मतदान यंत्रांतील या बिघाडामुळे वादग्रस्त ठरलेल्या या सर्व केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारीही आल्या होत्या. त्यांची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ५ विधानसभा क्षेत्रांतील ४९ केंद्रावर बुधवारी फेरमतदान घेण्याचे आदेश काढले. सर्वाधिक केंद्र गोंदिया व भंडारा विधानसभा क्षेत्रातीलच आहेत.

 

पालघरमध्येही झाल्या होत्या तक्रारी

दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघातही सोमवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदान काळातही मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या व मतदानात घोळ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, आयोगाने संपूर्ण चौकशीअंती मतदान यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला नव्हता, असा निष्कर्ष काढून या मतदारसंघात कोणत्याही केंद्रावर फेरमतदानाची गरज नसल्याचा निर्णय दिला होता.

 

गोंदियात कलेक्टरची बदली, पालघरात १ निलंबित
निवडणूक निर्णय अधिकारी व गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली. निवडणुकीतील घोळाची परिस्थिती काळे यांनी योग्य पद्धतीने हाताळली नाही. तसेच बोनसची रक्कम जमा करण्यास बँका अाणि कोशागार कार्यालय मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरू ठेवण्याचा त्यांचा आदेश वादग्रस्त ठरला होता. दरम्यान, पालघरमध्ये मतदानाचे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट २ खासगी वाहनांतून नेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला मंगळवारी निलंबित करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...