आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदी घोटाळा : सहकारी शेतकरी समितीच्या व्यवस्थापकास केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याचीच तूर खरेदी करणे तसेच टोकनच्या अनुक्रमांकात हेराफेरी करून नंतरच्या टाेकन क्रमांकाची तूर खरेदी करण्याच्या गैरप्रकार प्रकरणी येथील सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक राजेंद्र वामण गायकी वय ५७ यांना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली, तर ४ कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शासकीय तूर खरेदीतील हा गोंधळ 'दै. दिव्य मराठी'ने ५ व ६ मे रोजी लाच चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणात तालुका उपनिबंधक राजेश पालेकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

 
शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांचे चुकारे झाले नाहीत, तूर ठेवण्यासाठी गोदाम नसल्याने खरेदीही संथगतीने झाली होती. त्यातच अमरावती बाजार समितीत नाव नोंदवून टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी केल्याचा घोळ काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी सातबारा देऊन नावनोंदणी केली होती. परंतु दोन महिन्यांपासून खरेदीचा क्रमांक न आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी टोकन क्रमांकाबाबत चौकशी केली असता सदर टोकन क्रमांकावर दुसऱ्याच शेतकऱ्याची तूर खरेदी केल्याची गंभीर बाब समोर आली. 


दरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी संजय लव्हाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षात आणून दिली होती. या गंभीर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावतीचे तहसीलदार मालठाणे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच तालुका उपनिबंधक पालेकर यांनीही चौकशी केली. चौकशीदरम्यान अमरावती सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीने टोकनमध्ये केलेला गोंधळ पुढे आला. या प्रकरणात सोमवारी उशिरा रात्री तालुका उपनिबंधक पालेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक राजेंद्र गायकी यांना अटक केली. या केंद्रावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कर्मचारी गौरव गोपाल खाडे, नंदू राजेराम वाढोणकर, धीरज सुरेशराव गावंडे आणि अंकुश अशोक कदम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

आरोपींची संख्या वाढणार 
तक्रारीवरून सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीच्या व्यवस्थापकाला अटक केली असून, अन्य चार कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपासाअंती दोषी आढळणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करू. 
- मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर. 


एकाच टोकन क्रमांकावर पुन्हा खरेदी 
विविध क्रमांकाच्या १३ टोकन क्रमांकांवर पूर्वी ४ मे रोजी तूर खरेदी केली होती. त्यानंतर ५ मे रोजी त्याच टोकनवर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने तूर खरेदी केली. हा प्रचंड घोळ झाल्यामुळे शासकीय तूर खरेदीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासा तर मिळाला नाहीच, उलट तापदायक ठरली. 


अनेक शेतकऱ्यांनी कमी दराने विकली तूर 
शासकीय खरेदीत तुरीला हमीभाव मिळाला. मात्र अनेक शेतकऱ्यांची तूर शासकीय खरेदीमध्ये या गोंधळामुळे घेतलीच नाही. दुसरीकडे तुरीच्या पैशांवर खरिपाच्या पेरणीचा 'ताल' शेतकऱ्याला लावायचा आहे. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची विक्री करावी लागली. 

बातम्या आणखी आहेत...