आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीसाठी पूजा साहित्य खरेदीसाठी निघालेल्या सुन-सासऱ्यावर काळाचा घाला, चिमुकली जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ-गुढी उभारण्यासाठी आवश्यक पुजेचे साहित्य खरेदीसाठी दुचाकीने घराबाहेर पडलेल्या हेपट कुटूंबीयांवर आज शनिवारी काळाने घाला घातला. यामध्ये भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सासऱ्यासह सूनेचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेली चिमुकली किरकोळ जखमी झाली. हि खळबळजनक घटना आज, दि. १७ मार्च रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानक चौकात दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या घटनेतील मृतक महिलेच्या पतीचा तीन वर्षापूर्वी खून झाला असल्याने जखमी असलेली त्यांची मुलगी माही वय ३ वर्ष ही आता पोरकी झाली आहे. 

 

शहरातील पुष्पकुंज सोसायटीतील हेपट कुटूंबातील डॉ. वामनराव हेपट वय ६० वर्ष, अंजली हेपट वय २८ हे दोघे सासरे- सुन गुढीपाडवा सणानिमीत्त शनिवारी दुपारी बाजारात पुजेचे साहित्य घेण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच-२९-एपी-८७४७ नी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. हेकट यांची लहान नात माही, वय ३ वर्ष सुद्धा होती. दरम्यान बसस्थानक परिसरात सिग्नल लागल्याने त्यांनी थांबा घेतला. अशातच दारव्हा मार्गावरून येणारा ट्रक क्रमांक एमएच-३४-एम-४४३३ हा ट्रक देखील त्याच ठिकाणी सिग्नलवर थांबलेला होता. दरम्यान सिग्नल सुटताच भरधाव ट्रक पांढरकवडा रोडने निघाला. त्याचवेळी बाजूला असलेल्या दुचाकीला ट्रकचा कट लागल्याने दुचाकीवर असलेले डॉ. वामन हेपट, त्यांची सून अंजली हेपट आणि चिमुकली नात माही दुचाकीवरून खाली पडले आणि डॉ. वामन हेपट आणि अंजली हेपट दोघेही ट्रकच्या मागील चाकात अडकले तर चिमुकली माही रोडच्या कडेला जावून पडली. यात डॉ. वामन हेपट आणि अंजली हेपट दोघांच्या पायावरून ट्रक गेल्याने डॉ. हेपट यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी अंजली हेपट हिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बसस्थानक परिसरातील कर्तव्यावर असलेले पोलिसांनी धाव घेवून ट्रक चालक हकीम रहेमान चौधरी रा. अशोक नगर याला ताब्यात घेतले. त्यानंतर डॉ. वामन हेपट यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. 

 

जखमी अंजली हेपटच्या मदतीसाठी धावला नितीन 
बसस्थानक परिसरातील सिग्नलजवळ पायावरून ट्रक गेल्याने अंजली हेपट हिचा पाय तुटल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यावेळी याच मार्गाने दुचाकी घेवून जाणाऱ्या नितीन केदार याने आपली दुचाकी रोडच्या कडेला लावून अंजलीच्या दिशेने धाव घेतली आणि अॅटोरिक्षा अंजलीला घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये नेऊन दाखल केले. मात्र अंजली यांचा मृत्यू झाला. 

 

अपघातामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक झाली ठप्प 
शहरातील मुख्य असलेल्या बसस्थानक परिसरात दुपारी ट्रक आणि दुचाकीत अपघात झाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघातातील जखमी आणि मृतक कोण आहेत, हे पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी बसस्थानक चौकाकडे धाव घेतली होती. त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

 

चार वर्षात गमावले कुटूंबातील चौघे जण 
शहरातील पुष्पकुंज सोसायटीत वास्तव्य असलेल्या हेपट कुटूंबीयातील डॉ. वामन हेपट यांच्या पत्नीचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर सन २०१५ साली त्यांचा मुलगा व चिमुकल्या माहिचे वडील समीर हेपट यांचा अमरावती जिल्ह्यातील कोंढण्यपूर परिसरात खून झाला होता. दरम्यान आज, दि. १७ मार्च रोजी डॉ. वामन हेपट आणि त्यांची सून अंजली हेपट या दोघांचा मृत्यू झाल्याने घरात फक्त तीन वर्षीय चिमुकली माही एकटी पडली आहे. चार वर्षात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर यावेळी आईसाठी चिमुकल्या माहिने फोडलेला हंबरडा अनेकांच्या हृदयाचा थरकाप उडवणारा ठरला आहे. 

बातम्या आणखी आहेत...