आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्नाव, कठुअा अत्याचार प्रकरणांच्या हाताळणीवर संघ सरकारवर नाराज : न्या. काेकजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उत्तर प्रदेशातील उन्नाव व जम्मू-काश्मिरातील कठुअा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या घटना केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांनी ज्या पद्धतीने हाताळल्या, त्यावर संघ नेतृत्वाने बुधवारी थेट भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच  या चुका सुधारण्यासाठी घाईघाईने कठोर शिक्षेचा अध्यादेश आणला गेला, याकडेही संघ नेत्यांनी लक्ष वेधले.  


भाजपाध्यक्ष अमित शहा बुधवारी दुपारी बारा वाजता विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. या वेळी त्यांच्यासमवेत संघामार्फत भाजपशी समन्वयाची जबाबदारी असलेले संघाचे सहसरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल हेदेखील होते. या दोन्ही नेत्यांनी थेट संघ मुख्यालय गाठले. या वेळी मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी या नेत्यांशी सुमारे साडेतीन तास चर्चा झाली. या चर्चेत संघ नेत्यांनी उन्नाव आणि कठुआ प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनांची राज्य व केंद्र सरकारने वेळीच दखल घेतली नाही. प्रकरणाची धग जाणवू लागल्यानंतरही अतिशय चुकीच्या पद्धतीने दोन्ही प्रकरणे हाताळली गेली. त्यातून समाजात चुकीचे संदेश गेले, असे स्पष्ट मत संघ नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.   


संघ नेत्यांशी झालेल्या या बैठकीत अमित शहा यांची कर्नाटक निवडणूक, लिंगायत आरक्षणाच्या मुद्द्यांसह मध्य प्रदेशात, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांतील आगामी निवडणुकांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या नेत्यांपूर्वी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनीही संघ मुख्यालयात नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

अासारामला शिक्षा याेग्यच : न्या. काेकजे  

 

विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय महामंत्री न्या. विष्णू कोकजे यांनीही बुधवारी नागपुरात संघाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली.  अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अासारामला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय याेग्यच असल्याचे  कोकजे यांनी सांगितले. असल्या लोकांनी देव, देश आणि धर्म बदनाम केला आहे. असल्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, हे योग्यच झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, विहिंपचे माजी महामंत्री डॉ. प्रवीण तोगडिया यांचे उपोषण आणि त्यावरून देशभरात विहिंप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम यासंदर्भात त्यांनी बोलणे टाळले. विहिंप सुसंस्कृत संघटन असून आपल्या पूर्वसुरींबद्दल बोलण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे तोगडिया किंवा इतर कुणाबद्दलही आपण बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...