आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक महाविद्यालयांपुढे यावर्षीही रिक्त जागांचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने महाविद्यालयांना पुरेसे प्रवेश मिळत नसल्याचे चित्र मागील तीन ते चार वर्षात राज्यात दिसत असताना यावर्षी हे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. 


पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र महाराष्ट्रात सर्वदूर दिसत आहे. प्रवेश कमी झाल्याने महाविद्यालयांवर गंडांतर येऊन गेल्यावर्षी ८४ अभ्यासक्रम बंद करावे लागले. अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता कमी करावी लागली, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. गेल्यावर्षी राज्यात प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या ५३ टक्के जागा रिक्तच राहिल्या होत्या. मात्र, यावर्षी परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या आठवड्यात या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरु झाली असून आतापर्यंतचे नोंदणीचे चित्र अत्यंत निराशाजनक असल्याचे नागपूर विभागात आढळून आले आहे. 


१६ जुलैपर्यंत राज्यात ही प्रक्रिया चालणार आहे. मात्र, नोंदणीचे सध्याचे चित्र अत्यंत निराशाजनक असल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. नागपूर विभागातच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या २१ हजारांवर जागा असताना बुधवारपर्यंत केवळ साडेचारशे विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामुळे आगामी पंधरवड्यात नेमके काय होते, याकडे महाविद्यालयांचे लक्ष लागलेले आहे. पूर्वी उद्योगांकडून पॉलिटेक्निक पदविकाधारक वा आयटीआय केलेल्या उमेदवारांना उद्योगांकडून मोठी मागणी होती. मात्र, मागील दशकभरात ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. परिणामी, उद्योगांकडून उमेदवारांना मागणीच नसल्याने विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमांकडे कल कमी झाला आहे, अशी माहिती नागपुरातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...