आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.अध्यक्षांच्या गावातच आरोग्य केंद्राला ठोकले गावकऱ्यांनी कुलूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर रेल्वे / अमरावती- चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांचे गाव पळसखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रात्री ११ च्या सुमारास गंभीर स्थितीत उपचारासाठी नेले असता, मुख्य डाॅक्टरसह सहायकही उपस्थित नसल्याचे बघून गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री ११.३० च्या सुमारास कुलूप ठोकून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य बघून जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना पीएचसीकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. 


जि. प. अध्यक्षांच्या गावातील ही स्थिती तर इतर गावातील स्थिती कशी असेल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. रविवारी रात्री १० च्या सुमारास गावातील तरुण गोपाल मडके (वय ३० ) याने गावालगतच्या शासकीय विहिरीत उडी घेतली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी त्या विहिरीकडे धाव घेऊन गोपालला बाहेर काढले व त्याला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र आरोग्य केंद्रात दोन्ही डाॅक्टर उपस्थित नव्हते. त्या नंतर एक आरोग्य परिचारिका आल्या व त्यांनी जमेल तसा उपचार केला. मात्र त्या ठिकाणी निवासी डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य उपचार होऊ शकला नाही. रुग्णाची गंभीर स्थिती बघून त्याला १०८ रुग्णवाहिकेतून चांदूर रेल्वे येथे पाठवले. सध्या गोपालची प्रकृती स्थिर आहे. मात्र पीएचसीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असताना निवासी डाॅक्टर अनुपस्थित असल्याने गावकरी संतापले. त्यांनी जि. प. अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. 


परिणामी गावकऱ्यांनी माजी सरपंच संजय पुनसे यांच्या नेतृत्वात प्राथ.आरोग्य केंद्राला रात्री ११.३० च्या सुमारास कुलूप ठोकले. या आधीही बरेच रुग्ण रात्री उपचारासाठी पळसखेड पीएचसीमध्ये गेले असता त्यांना आवश्यक उपचार मिळाले नाहीत. डॉक्टर मुख्यालयी हजर राहत नसल्याने बरेचदा आरोग्य सेविकाच रुग्णांवर जमेल तसा उपचार करतात. पण, डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने गावातील रुग्णांची गैरसोय होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष याच गावातील असताना निवासी डाॅक्टरांवर त्याचा कोणताही परिणाम होत का नाही, असा प्रश्न गावकरी वित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज (दि.२५ जून) सकाळी पीएचसीमधील डॉक्टर आल्यावर त्यांनी संजय पुनसे यांना कुलूप उघडण्याची विनती केली. परंतु, पुनसे व गावकऱ्यांनी कारवाईशिवाय कुलूप उघडण्यास नकार दिला. त्यावेळी जि. प. अध्यक्षांनी येऊन मध्यस्थी केली व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. बेजबाबदार डाॅक्टरांवर कारवाई करू, अशी हमी जि.प.अध्यक्षांनी दिल्यानंतर पीएचसीचे कुलूप उघडले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल देशमुख, अमोल नाखाले, अवधूत धाडस, गणेश निमकर, रोशन जेवढे, पंकज अलोणे, योगेश मते, संदीप पुंडसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. 


डाॅक्टरच आरोग्य केंद्रात राहत नाहीत 
रात्री रुग्ण पीएचसीत पोहोचल्यावर डॉक्टर कधीच जागेवर दिसत नाहीत. रुग्णाला योग्य उपचार मिळत नाही. डाॅक्टर येतात कधी, जातात कधी ते कळत नाही. त्यामुळे आज फक्त कुलूप ठोकले. यापुढे गावकरी तीव्र आंदोलन करतील. 
- संजय पुनसे, माजी सरपंच, पळसखेड 


प्रशासकीय कारवाई डाॅक्टरांवर करणार 
गावकऱ्यांनी केलेली मागणी अतिशय योग्य आहे. डॉक्टर मुख्यालयी हजर राहत नाही अशा तक्रारी आल्या होत्या. त्याचवेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आता मात्र बेजबाबदार कर्मचारी व डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. 
- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद 


रुग्ण बघण्यासाठीच डाॅक्टर गेले होते 
पळसखेड पीएचसीमध्ये दोन कायमस्वरूपी डाॅक्टर असून सहायक डाॅक्टर दुसऱ्या गावी रुग्णसेवेसाठी गेले होते तर िनवासी डाॅक्टरही अन्य एका रुग्णाला बघण्यासाठी गावातच होते. मात्र पीएचसीमध्ये नव्हते. मी स्वत: गावात जाऊन घटनेची माहिती घेतली. 
- डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...